माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.

#माझा_बळी_का? (एसटी रडतेय...)


आई गss.. ए आई, नको ना मारू, दुखतंय.. ही वाक्य आपल्या सर्वांच्या कानावरून गेली आहेत. गेली आहेत म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या तोंडी ही वाक्ये लहान असताना आली आहेत. आठवल का काही? लहान असताना आपण एखादी चूक केली की आई किंवा वडील आपल्याला मारताना आपल्या तोंडून ही वाक्ये निघायची. व्हायच्या ना वेदना मार मिळाल्यावर??
हे उदाहरण देण्याचा उद्देश हाच की, आपण जेव्हा एसटीवर दगडफेक करतो तेव्हा आपली एसटी सुद्धा असच ओरडतेय, तिला होणाऱ्या वेदनांनी ती विव्हळतेय. हो, आपली एसटी रडतेय...

एसटी म्हणजे सर्वसामान्य प्रवाश्यांची हक्काची जीवनवाहिनी, हक्काचे प्रवासाचे साधन. पण आज आपण या हक्काचा जरा जास्तच दुरुपयोग करतोय किंवा जास्तच हक्क गाजवतोय अस मला वाटू लागलंय.
हो, याच मुख्य कारण म्हणजे, एखाद्या संपात, आंदोलनात अगदी सर्रास पणे टार्गेट केली जाते ती आपली एसटी. आंदोलन किंवा संप कोणत्याही कारणासाठी असुदेत त्या गोष्टीशी एसटीचा काडीमात्र सबंध नसताना तिच्यावर दगडफेक केली जाते, काही ठिकाणी तर पूर्ण गाडीच पेटवली जाते.

का? एसटीच का? तिचा या सगळ्यांशी काय संबंध? एसटीवर दगडफेक करून आपल्याला आपले हक्क मिळणार आहेत का? सरकार वर असलेला राग एसटीवर काढून काय साध्य होणार आहे? जिने आपल्याला लहानपणापासून आपल्या कुशीत घेऊन या महाराष्ट्रात फिरवले, जिच्यातून आपण शिक्षणासाठी नेहमी प्रवास केला, तिच्यावर दगड फेकताना जराही आपल्या मनात तिच्या या मायेचे, उपकारचे विचार आले नाहीत का?
विचार करा...

एसटी नसेल तर आपले काय हाल होतात हे जरा आठवा. ऐन दिवाळीत एसटी कामगारांनी आपल्या हक्कासाठी संप केला त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाश्यांचे कसे हाल झाले होते हे आठवा.. एखाद्या ठिकाणी जायचे एसटीचे तिकीट 50 रुपये असेल, पण जेव्हा एसटी बंद असते तेव्हा त्याच ठिकाणी जायचे 50 रुपये च्या जागी प्रायव्हेट गाड्यांना 100-150 रुपये द्यावे लागतात तेव्हाची वेळ आठवा.. एखाद्या गावातून एखाद्या दिवशी एसटी बस बंद असेल तर त्या गावातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती हाल होतात ते आठवा..
सोशल मिडिया वर एक वाक्य वाचलं होतं, एसटी कर्मचाऱ्यांची ही भावना होती, की ' एसटी आमच्या साठी आमची आई/माऊली आहे, तिच्यामुळेच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, लाखो कर्मचारी एसटीवर अवलंबून आहेत, आमच्या आईला मारू नका, तिला मारलेला दगड हा प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याच्या काळजाला मारलेला दगड आहे.' खर तर, फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या नाही तर प्रत्येक एसटी प्रवाश्याच्या काळजाला तो दगड लागला पाहिजे, कारण आपण हक्काने आपली एसटी असे म्हणून तिच्यातून फिरतो, आपल्या मुलांना त्याच एसटीतून शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

एवढे सगळं असून देखील आपली एसटी कोणतीही तक्रार न करता, मनात कोणत्याही प्रकारचा राग किंवा द्वेष न ठेवता, अविरतपणे सेवा देते. सुरुवातीलाच दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जेव्हा वडीलधारी व्यक्ती आपल्याला रागावते किंवा मारते त्यावेळी आपल्याला कधी कधी राग येतो आणि आपण रागावून बसतो, घरात कोणाशी बोलत नाही, पण हेच एसटीच्या बाबतीत पाहिलं तर आपण तिच्यावर दगड फेकतो, तेव्हा तिला सुद्धा राग येत असणार पण त्या रागामुळे ती कधीच आपल्या सेवेत खंड पडू देत नाही.

अजून एक वाक्य वाचलं होतं, ' आज एसटीवर दगडफेक आणि जाळपोळ करणारे, उद्या त्याच एसटी ने अगदी मानाने प्रवास करतील.' (अगदी निर्लज्जपणे)

आपण गाड्या फोडतो, जाळतो, आणि आपणच अपेक्षा करतो की एसटी नीट असली पाहिजे. हे म्हणजे अस झालं की 'परीक्षेचा अभ्यास करायचा नाही, पण देवाकडून अपेक्षा करायची की देव मला पास करेल'.
मला काहीजण लालडब्बा म्हणतात तर काहीजण खिळखिळी म्हणतात पण ज्याप्रमाणे तुमचे आई-वडील तुमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करून वृद्ध होतात, आणि तरीही ते तुमच्यासाठी झटतात अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अहोरात्र सेवा देऊन मीही हळूहळू थकते, खिळखिळी होते, पण त्या परिस्थितीतही तुम्हाला शक्य तेवढी सेवा देते. या गोष्टीचा कधी विचार केला का आपण??

एसटीने आपल्याला दिलेल्या या सेवेबद्दल, तिच्या या प्रेमाची परतफेड म्हणून आपण तिला काय देतोय? तर दगड आणि काठ्यांचा मार.. ही अशा प्रकारची मिळालेली परतफेड पाहून त्या बिचाऱ्या एसटीला काय वाटलं असेल याचा कधी विचार केला का? (तुम्ही का विचार कराल म्हणा, कारण विचार केला असता तर एसटीवर दगडफेक केलीच नसती)
शेवटी सांगायचं तर , आपल्या हक्कासाठी लढा, यासाठी तुम्ही केलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, पण या आंदोलनात एसटी बसेस वर दगडफेक करणे, जाळपोळ करणे ही कृत्ये नका करू.
एसटी बस वर दगडफेक करून, काहीही साध्य होत नाही. उलट आपण आपल्याच सेवेसाठी असलेल्या साधनांची नासधूस करतोय एवढं लक्षात ठेवा.

आपली एसटी सुद्धा आपल्याला हेच सांगेल की हक्कासाठी लढा, पण माझा यात काहीही दोष किंवा संबंध नसताना मला मारू नका, माझा बळी घेऊ नका.
आणि हो, एसटीवर दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या व्यक्तीनी जर हा लेख वाचला तर यात असणाऱ्या प्रश्नांवर नक्की विचार करा.
.
.
प्रथमेश गो. गुरव.
(एसटी प्रेमी) सावंतवाडी.
7768904744

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण