विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

 विदर्भाची बात काही औरच
 एसटीने जास्तीत जास्त फिरणे हे आपल्या सारख्या एसटीप्रेमींच उद्दिष्ट असतं . एसटीचा प्रवास हा आपल्याला नेहमी हवाहवासा वाटतो.कारण तिचा प्रवास हा नेहमीच जलद आणि सुरक्षित असतो . माझा मनात सुद्धा बरेच दिवस कुठेतरी ३-४ दिवस एसटीने फिरून येऊ असा विचार चालू होता. परंतु सुट्ट्या नसल्यामुळे नियोजन काही होत न्हवते. शेवटी फेब्रुवारी महिन्यात २३-२४-२५ तारखेला सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे तेव्हाच प्लॅन करू असं मी ठरवलं. या प्लॅन मध्ये लोणार सरोवर आणि शेगाव येथील गजानन महाराज यांचे दर्शन घेणे हा मुख्य हेतू होता.
प्लॅन ठरल्या नंतर मी एक आठवडा अगोदर ४ दिवसांचा आवडेल तेथे प्रवास हा पास काढून घेतला. पास काढल्या नंतर तुम्हाला कधी प्लॅन सुरु होतोय असच वाटत असतं .मला सुद्धा हेच वाटत होत कि , कधी आपला प्लॅन सुरु होतो आणि मी एसटी मध्ये बसतोय. हि उत्सुकता मनाला खूप आनंद देत असते.

शेवटी तो दिवस आलाच.ऑफिस करूनच प्लॅन सुरू करायचं हे अगोदरच ठरलेले असल्यामुळे मी ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी ६ वाजता कुर्ला नेहरू नगर बस स्थानक गाठले.मला शिवाजी नगर येथे जायचे होते त्यामुळे मी संध्याकाळी ६:३० वाजता सुटणारी मुंबई - अंबाजोगाई हि गाडी पकडली.

माझी गाडी बरोबर ६:३० वाजता निघाली. मुंबईतील ट्रॅफिक चा सामना करत ,रमतगमत या गाडीने मला रात्री ११:४५ वाजता शिवाजी नगर येथे सोडले. तिथे उतरल्यावर मी १० मिनटे फँनिंग केले. आता मला औरंगाबादला जायचे असल्यामुळे मी औरंगाबाद कडे जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागलो. तेवढ्यात पुणे – भुसावळ ही गाडी प्लॅटफॉर्म वर लागली. कदाचित ही महाशिवरात्री असल्यामुळे जादा गाडी होती.मला खान्देशच्या गाड्या जरा जास्तच आवडतात म्हणून मी याच गाडीने औरंगाबाद पर्यंत जावू अस ठरवल. कंडक्टर काकांनी डायरेक्ट औरंगाबाद सांगितल्या मुळे गाडी सुरवातीलाच पूर्ण भरली.

ही गाडी रात्री १२:१५ वाजता निघाली.हायवे लागल्यावर गाडीने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. सगळ्याचं वाहनांना मागे टाकत ती सुसाट धावत होती. मी सुद्धा खिडकीतून येणारी थंड हवा घेत प्रवासाचा आनंद घेत होतो.अहमदनगर सोडल्या नंतर पुढे लगेच चहा पिण्यासाठी आमची गाडी थांबली.दहा मिनटे फ्रेश झाल्यावर परत प्रवास सुरू झाला आणि सकाळी ४:४५ वाजता या गाडीने मला औरंगाबाद येथे पोचवलं.

औरंगाबाद येथे उतरल्यावर मी फ्रेश झालो आणि उभ्या असलेल्या गाड्या बघू लागलो.तसेच बरेच फोटो सुद्धा काढले.मला जालना कडे जायचे असल्यामुळे मी चौकशी कक्षा कडे चौकशी केली असता कळले की जालना जण्या साठी औरंगाबाद सिडको येथून बऱ्याच गाड्या आहेत. मग मी औरंगाबाद मध्यवर्ती स्थानक येथून रिक्षा पकडली आणि सरळ औरंगाबाद सिडको स्थानक गाठले.

औरंगाबाद सिडको स्थानकात पोचल्यावर समोरच औरंगाबाद – परतवाडा ही गाडी लागली होती. मी लगेच त्या गाडीत जावून बसलो.गाडीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच प्रवासी होते.गाडी निघाल्या नंतर मी केबिन सिट मध्ये जावून बसलो. केबिन सीटने प्रवास करणे हे आपल्या एसटी प्रेमींची सगळ्यात आवडती गोष्ट. मी सुद्धा मनसोक्त केबिन सीटचा आनंद घेतला. या गाडीने मला ७:४५ वाजता जालना येथे सोडले.

जालना येथे उतरल्यावर मी पहिला चहा पिला. त्यामुळे अगदीच फ्रेश वाटायला लागले.येथे मला बरेच चांगले रूट बघायला मिळाले. जवळपास १५-२० मिनटे झाल्यावर मी लोणार कडे जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागलो. तेवढ्यात औरंगाबाद – कारंजा या गाडीने जालना स्थनकात प्रवेश केला. मी याच गाडीने लोणार पर्यंत जावू असं ठरवले.

मी कंडक्टर काकांचा बाजूचा सिट वर बसलो.आमची गाडी लगेच सुरू झाली. ही गाडी पूर्ण भरलेली होती.मला आता आपण खरया अर्थाने विदर्भ कडे वाटचाल करत आहोत असं वाटले. माझी गाडी देऊळगाव राजा येथे स्टँड वर लागत असताना मी आपले ग्रुप सदस्य वैभव भुसारी यांना फोन केला आणि ते तिथे जवळच असल्यामुळे आमची छोटीशी पण छान भेट झाली. एवढ्या कमी वेळात ते आल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. ड्रायव्हर काकांनी सुधा २ मिनटे जास्त गाडी आमचा साठी थांबवली होती. भेट घेवून मी पुन्हा गाडीत बसलो आणि आमची गाडी मार्गस्थ झाली.
आता कंडक्टर काकांचा गाडीतील सर्व प्रवाशांचा तिकीट काढून झाल्या होत्या.त्यामुळे ते त्यांचा सीट वर येवून बसली. मी सुद्धा त्यांचा बाजूला असल्यामुळे त्यांचा सोबत गप्पा मारायला सुरुवात केली.त्यांची वैदर्भीय बोली मला खूपच आवडली.मला मुळातच भाषा खूप आवडतात.या ग्रुप वरील कोणी मला वैदर्भीय, खान्देशी भाषा शिकवली तर मी त्यांचा आभारी असेन. कंडक्टर काकां सोबत गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांना सुद्धा मी एवढ्या लांबून विदर्भ बघायला आलोय याचं कौतुक वाटत होत. गप्पांच्या ओघात लोणार कधी आले हे मला कळलेच नाही. तेव्हा सकाळचे १०:४५ वाजले होते.

लोणार येथे उतरल्यावर मी खरया अर्थाने विदर्भात आलोय अस वाटल. कारण तेथील उन विदर्भाची जाणिव करुन देत होत. येथील लोक एवढ्या उष्ण वातावरणात कसे राहतात याचाच मी विचार करत होतो. कंडक्टर काकांचा निरोप घेवून मी आजूबाजूला लोणार सरोवर कुठे आहे याची चौकशी करायला लागलो. तेथील लोकांनी मला १० मिनिट चा अंतरावर लोणार सरोवर आहे अस सांगितल.



मी लगेचच लोणार सरोवराच्या दिशेने आगेकूच सुरू केली.उन्हाच्या झळा अंगाला चांगल्याच लागत होत्या. लोणार स्टँड पासून बरोबर १०-१५ मिनटे चालत गेल्यावर मी लोणार सरोवर येथे पोचलो आणि तो निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघतच बसलो.लोणार सरोवरची  भव्यता खूप मोठी आहे.खरचं हे ठिकाण खूप मस्त आहे.संपूर्ण लोणार सरोवर पाहण्या साठी जवळपास २-३ तास लागतात. माझाकडे एवढा वेळ नसल्यामुळे मी लगेच तिथून लोणार स्टँड कडे आलो.
लोणार स्टँड ला आल्यावर मी मेहकर कडे जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागलो. गाडी येई पर्यंत मी तिथेच बराच वेळ घालवला. अंदाजे अर्ध्या तासाने मेहकर ची गाडी लागली आणि मी पटकन चढून विंडो सीट पकडली. आता माझी गाडी मेहकर कडे रवाना झाली. रस्ता बराच खराब असल्यामुळे गाडीतील प्रवाशी अक्षरशः उडणे – बसणे हाच खेळ खेळत होते. जवळपास एका तासाने मी मेहकर येथे पोचलो. मेहकर येथे उतरून मी लगेच बुलढाणा जाणारी गाडी पकडली.

मेहकर – चिखली – बुलढाणा या गाडीने माझा प्रवास सुरू झाला. चालक काका मस्त गाडी पळवत होते.जवळपास २ तास नंतर मी बुलढाणा येथे पोचलो. उतरल्या उतरल्या मी जेवण करण्यासाठी हॉटेल शोधू लागलो कारण पोटात कावळे ओरडत होते. थोड्या वेळाने माझी नजर एका हॉटेल वर गेली आणि मी एक थाळी ऑर्डर केली.थाळीत शेवभाजी , रोटी ,भात असे पदार्थ होते. विदर्भातील जेवणाची चव मी पहिल्यांदाच चाखत होतो. जेवण अगदीच झणझणीत होते. जेवण आटोपून मी पुन्हा बुलढाणा स्थनाकात आलो. थोडे फोटो काढले आणि चांगले मार्ग सुद्धा बघितले.

आता मला खामगाव कडे जायचे होते म्हणून मी खामगाव कडे जाणारी गाडी पकडली.गाडी पूर्ण भरली होती.नशिबाने मला शेवटची विंडो सीट मिळाली. लगेचच माझा खामगाव चा दिशेने प्रवास सुरू झाला. थोड्या वेळाने बोथा घाट लागला. नक्की मला नाव आठवत नाही पण बोथा असच काहीतरी होत. हा प्रवास माझा सगळ्यात चांगला प्रवास होता.कारण रस्त्याचा दोन्ही बाजूने उंचच उंच झाडे होती.एसटीतून जंगल सफारी करतोय असेच मला वाटत होते. या प्रवसाचा मी मनसोक्त आनंद घेतला.

या प्रवसाचं आनंद घेत कधी खामगाव आले कळलेच नाही. खामगाव ला उतरल्या नंतर मी खूप फोटो काढले. खामगाव येथे बरेच चांगले रूट तुम्हाला बघायला मिळतात.अर्धा तास मी खामगाव स्टँड वर घालवला.

आता माझे नियोजन शेगाव गाठणे हे होते.खामगाव वरून दर अर्ध्या तासाला शेगाव जाण्यासाठी आपली एसटी असते. मी शेगाव जाण्या साठी गाडी पकडली आणि अर्ध्या तासातच शेगाव येथे पोचलो.शेगाव येथे आल्या नंतर मी मंदिराकडे कसे जायचे याची माहिती घेतली. जवळपास १५ मिनटे चालत गेल्यावर मी शेगाव मंदिर येथे पोचलो आणि गजानन महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो. अर्धा – पाऊण तास रांगेत उभा राहिला नंतर शेवटी गजानन महाराज यांचं दर्शन घेतले. खरचं खुप छान दर्शन झाले. मला खूपच शांत वाटत होते. मन प्रसन्न झाले होते.
शेगाव येथे मुक्काम करणे हे अगोदरच ठरवले होते. त्यामुळे मी मुक्काम कोठे करता येईल याचा विचार करू लागलो. तिथे असणाऱ्या एका माणसाने मला तुम्ही भुस्कुटी मळा येथे जावा असे सांगितले. अगदी १० रुपयात तुमची चांगली सोय होईल अशी माहिती त्यांनी दिली. मी लगेच ते ठिकाण गाठले. तेथे १० रुपये देवून पावती घेतली आणि हॉल मध्ये गेलो. हॉलमध्ये प्रत्येक वैयक्तिक गादी आणि अंगावर चादर दिली होती.खरच खूप छान व्यवस्था होती.एवढ्या कमी पैशात एवढी चांगली सुविधा मी पहिल्यांदाच बघत होतो.अशी व्यवस्था बघून मी भारावून गेलो होतो.

नंतर मी जेवण आटोपून घेतले..दिवसभर प्रवास करून थकलो असल्यामुळे मला लगेच झोप लागली.सकाळी ६ वाजता मला आपोआप जाग आली. उठून मी मस्त अंघोळ केली. अंघोळ करण्या साठी छान व्यवस्था होती. सर्व आटोपून मी तिथून निघालो. बाहेरून पुन्हा एकदा  महाराजांचे दर्शन घेतले.थोड पुढे गेल्यावर मी तर्री पोहे खाल्ले. तर्री पोहे ही विदर्भातील खास डिश आहे. गरम पोह्यांवर मारलेला झणझणीत रस्सा बघितल्यावर तुमचा तोंडाला आपोआप पाणी सुटते. मी मस्त पोह्यांवर ताव मारला.

मला पुढे नागपूरला जायचे असल्यामुळे मी सरळ स्टँड गाठले. स्टँड ला पोचल्यावर बघतील ते शेगाव – साकोली ही गाडी निघतच होती. मी पळत पळतच ती गाडी पकडली. ही नवीन विठाई होती. त्यामुळे आपला प्रवास चांगला होणार अस मला वाटल. ड्रायव्हर काका खूप गाडी पळवत होते. आमची गाडी ८०-८५ प्रतीतास या वेगाने पळवत होती. ड्रायव्हर काका सगळ्यांना ओव्हरटेक करत सुटले होते. विदर्भातील सुपरफास्ट ड्रायव्हिंग मला यामुळे बघता आली.

आमची गाडी खूप मस्त पळत होती. ८:३० वाजता गाडी अकोला येथे पोचली. चालक – वाहक काकांनी काहीतरी काम असल्यामुळे गाडी १० मिनटे थांबेल असे सांगितले. तेव्हा मी लगेच आपले ग्रुप सदस्य पियूष पाटील यांना फोन केला. ते सुद्धा लगेच आले आणि आमची छान भेट झाली. तो पर्यंत चालक – वाहक काका आले होते. मग आमची गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. अमरावती येथून पुढे हायवे लागल्यावर तर गाडीने खूप चांगला वेग पकडला होता. आमची गाडी दणदणीत ओव्हरटेक करत होती.पुढे कारंजा येथे आमची गाडी जेवायला थांबली. जेवण झाल्यावर आम्ही परत निघालो आणि दुपारी २:३० वाजता मी नागपूर येथे पोचलो.

नागपूर येथे आल्यावर आपण एवढं लांब आलोय यावर माझा विश्वास बसत न्हवता. येथे मी २-३ तास बसलो होतो.खूप फोटो काढले तसेच गाड्या बघितल्या. संध्याकाळी ६ वाजता नागपूर – नांदेड गाडी पकडली आणि मी नांदेड येथे आलो. नांदेडला उतरून मी नांदेड – सांगली गाडी पकडली. त्या गाडीने सोलापूर येथे उतरलो. सोलापूर वरून सोलापूर – अर्नाळा गाडीने मेगा हायवे ला हॉटेल वर नाश्ता साठी गाडी थांबली असताना मला सातारा – बोरिवली शिवशाही दिसली आणि मी ती पकडून सरळ बोरीवली येथे पोचलो.

या प्रवासात बरेच चांगले – वाईट अनुभव मिळाले. प्रवासात बघितलेले लोणार सरोवर आणि शेगाव मदिर, विदर्भ तसेच विदर्भतील उन, नागपूर ते मुंबई केलेला सलग २७ तासांचा प्रवास ही या प्रवासाची वैशिष्ट्य ठरली.

शाळेत शिकलेला महाराष्ट्राचा भूगोल आज मला बघता आला आणि पुढे बघता येईल तो ही फक्त आपल्या लाडक्या एसटीमुळेच....
धन्यवाद
श्रीकांत चांगण

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.