ठाणे - हैदराबाद ह्या माझ्या जिव्हाळाच्या गाडीच्या शिलेदारांचा निरोप समारंभ...
ठाणे - हैदराबाद गाडी सुरु झाल्यानंतर त्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या चालक आणि वाहकांशी एक ऋणानुबंध निर्माण झाले. कधीही ठाणे २ आगारात किंवा खोपट बस स्थानकात गेलो आणि त्यांची भेट झाली, तर गप्पा मारल्याशिवाय आणि चहा प्यायल्याशिवाय ते जाऊच देत नसत. त्यातल्या त्यात पुण्यात इंटर्नशिप करत असताना कित्येकदा ह्याच चालक आणि वाहक दादांसोबत ठाणे - हैदराबाद/ अक्कलकोट / तुळजापूर गाडीने ठाणे - पुणे - ठाणे असा प्रवास करत असे. तेव्हादेखील नाश्ता करायला ते आवर्जून नेत असत. स्वतःचे गाव सोलापूर / उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याने ठाणे २ आगाराचे त्या भागात जाणारे जेवढे मार्ग आहेत, त्या मार्गांवर त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन गाडी चालविल्या आणि एस. टी . च्या उत्पन्नात नेहमीच भर घातली.
मागेच एक अध्यादेश निघाला कि एस. टी . चे चालक आणि वाहक हे आपल्या घरापासून लांब दुसऱ्या आगारांमध्ये आहेत, व ज्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत, त्यांना त्यांच्या घराजवळील विभागात ट्रान्स्फर दिल्या गेल्या. त्यानुसार ह्या चालक आणि वाहकांपैकी बरेच जण आपल्या मूळ गावी म्हणजे सोलपवर आणि उस्मानाबाद विभागात जाणार होते. तेव्हा आता त्यांना पुन्हा जास्त भेटता येणार नाही म्हणून त्यांच्यासाठी छोटा निरोप समारंभ करायचे मी आणि संकेतने ठरवले.
त्यानुसार काल आम्ही ठाणे २ आगारात जाऊन एक छोटा केक नेला आणि तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत हा केक कापला. तसे तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असेच चित्र होते. कारण दुःख ह्या गोष्टीचे होते कि त्यांना ह्यापुढे जास्त भेटता येणार नाही आणि ते आपल्या गावी आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ राहू शकतील ह्याबाबतचे सुख देखील होते. अनेक कृचे ह्या प्रसंगी डोळे देखील पाणावले होते. पण आता ते आपल्या गावी आपल्या घराजवळील आगारांमध्ये रुजू होणार, ह्यातच आनंद आहे.
तर असा हा छोटेखानी निरोप समारंभ काल ठाणे २ आगारात आम्ही साजरा केला. श्री संगपाळ , श्री बनसोडे, श्री भरगंडे, श्री कुंभार, श्री अनुसे इत्यादी इत्यादी अनेक चालक आणि वाहकांना मी कधीच विसरणार नाही. अशा ह्या सर्व चालक आणि वाहक ह्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!!!!
- सिद्धेश काणेकर
Comments
Post a Comment