एसटीमधील देवदूतांना सलाम -संकेत मोरे
महाड दुर्घटनेतील देवदुतांपैकी एक, गुहागर - बोरीवलीचे चालक व वाहक...
दिनांक २ ऑगस्ट २०१६. रात्री ११:१५ - ११:३० ची वेळ. महाराष्ट्रात तुफान पाऊस चालू होता. त्यातच कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. महाबळेश्वर आणि महाड परिसरातील संततधार पावसामुळे महाड जवळील सावित्री नदी आणि काळ नदीला भयंकर पूर आला आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला. त्यातच ह्या दोन नद्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाड येथे एकमेकांना मिळत असल्याने दोन्ही नद्यांच्या पाण्यामुळे त्यांचा आधीच झालेला रुद्रावतार आता आणखी प्रलयंकारी झाला. त्यातच ह्या पुराच्या पाण्याने मुंबई - गोवा महामार्गावरील महाड शहरानंतर असणारा राजेवाडी येथील १०० वर्षे जुना ब्रिटीश कालीन पूल पावसाच्या पाण्याच्या तडाख्याने काही समजायच्या आतच ढासळला आणि नावाप्रमाणेच सर्वांसाठी काळ बनून आला.
राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतुकीची वर्दळ तर होतीच, पण मुसळधार पाऊस आणि किर्र अंधार ह्यांमुळे समोरचे दिसणे देखील कठीण होऊन गेले होते. पूल कोसळल्याने कित्येक वाहनांना काही कळायच्या आत ह्या सावित्रीने आपल्या उदरी गिळंकृत केले होते आणि त्यातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २ बसेस राजापूर - बोरीवली आणि जयगड - मुंबई सेंट्रल देखील काही समजायच्या आत ह्या नदीच्या शिकार झाल्या आणि ७-८ गाड्यांसोबतच ह्या बसेसना आणि त्यांच्यातील प्रवाशांना काही समजायच्या आतच जिवंत जलसमाधी मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी घटनांपैकी हि एक घटना!!!
तर तिकडे दुसरीकडे त्याच रात्री ८ वाजता गुहागरहून बोरिवलीला जायला एम. एच. २० बी. एल. २९९० हि बस निघाली होती. चालक श्री संजय केदार आणि वाहक श्री सुरेश जाधव हे ह्या मार्गावर आपले कर्तव्य बजावत होते. गुहागर ते रामवाडी अशी ते हि गाडी नेणार होते. नेहमीप्रमाणे बस ९:१५ च्या आसपास चिपळूण बस स्थानकात आली आणि जेवायला थांबली. तिच्या सोबतच जयगड - मुंबई आणि राजापूर - बोरीवली देखील चिपळूण बस स्थानकात क्रू चेंज साठी थांबल्या होत्या. क्रू चेंज झाल्यावर ह्या दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या आणि गुहागर - बोरीवली देखील ह्याच गाड्यांसोबत रोज रामवाडी पर्यंत एकत्र जाते, पण दोन प्रवाशांना जेवायला थोडा उशीर झाला आणि हि गाडी ५ मिनिटे उशिरा निघाली आणि गाडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला लागली.
पाऊस तर भयंकरच पडत होता आणि त्या दोन गाड्या बऱ्याच पुढे निघून गेल्या होत्या. कशेडी घाट ओलांडून गाडी पोलादपूरला आली, आणि पुढे महाडकडे ती कूच करत होती. मुसळधार पावसामुळे समोरचे कमी दिसत होते. अखेर तो मरणाकडे नेणारा पूल आलाच, त्या पुलावर एक १०० मीटर गेल्यावर त्यांनी तेवढ्यात चालक काकांनी गाडी थांबवली. त्यांच्या समोर २० - २५ फुटांवर एक क्वालीस गाडी होती. त्यांनी असे पाहिले कि समोरची क्वालीस गाडी रिव्हर्स घेऊन उजव्या बाजूला वळून रिटर्न मागे जात आहे. तेवढ्यात त्यांना काहीतरी भयंकर घडल्याचे कळून आले आणि ते गाडीतून उतरले. पाहतो तर काय!! पूल तुटलेला होता आणि तेथे उपस्थित एका माणसाने देखील त्यांना ह्याबाबत माहिती दिली. नंतर मग चालक काकांनी तत्परतेने १०० मीटर गाडी रिव्हर्स घेतली आणि पुन्हा हायवेवर येऊन थांबवली.
पुढे मग त्यांनी देवदुताप्रमाणे मागून येणाऱ्या गाड्यांना समोर पूल तुटला असल्याने पुढे न जाण्यास सांगितले. त्यानंतर ५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना देखील ह्या दोघांनी पुढे कोणत्याही गाडीला जाऊ देऊ नका, पूल कोसळला आहे, अपघात होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मग पुढील वाहतूक अडवून धरली आणि चालक व वाहक त्यांनी आपल्या आगाराच्या इतर गुहागर - भांडूप, गुहागर - मुंबई सेंट्रल ह्या गाड्यांच्या चालकाला देखील ह्या पुलाच्या बाबतीत सूचना देऊन सावध केले आणि अशा प्रकारे ह्याचालक व वाहकांमुळे अनेकांचे प्राण वाचले.
ह्या अपघातात खरे तर सर्वांत पहिला देवदूत ठरला तो बसंत कुमार. त्याने लवकरात लवकर हि घटना पाहिली नसती तर कदाचित अजून वाह्नांना आणि लोकांना जलसमाधी मिळाली असती. त्याचप्रमाणे श्री केदार आणि श्री जाधव ह्यांनी देखील प्रसंगावधान दाखवून अनेक लोकांचे जीव वाचवले.
त्यांच्या ह्या महान कार्याला एक सलाम _/\_
Comments
Post a Comment