होय, मी आहे ती १५३२ !!! - संकेत मोरे

आपला एवढा मोठा हा महाराष्ट्र! अगदी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत उभा आडवा पसरलेला विस्तृत भूभाग. कुठे अवघड वळणांचे घाट, कुठे सागरी किनारे, कुठे अगदी दुर्गम गावे, तर मुंबई पुण्यासारखी मोठी शहरे!!! सर्वत्र मी व माझ्या बहिणी अव्याहतपणे सेवा देत आहोत. एवढ्या मोठ्या राज्यात आणि आजूबाजूच्या राज्यांतदेखील आम्ही अखंडपणे धावत आहोत. आज वाहतुकीच्या इतक्या सुविधा असताना देखील सर्व सामान्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे हे पाहून खरंच अगदी मन भरून येते. आम्ही आमच्या कर्तव्यात कधीच कसूर करत नाही, आणि कधी करणारही नाही. कारण आमचे ब्रीदच आहे, ' प्रवाशांच्या सेवेसाठी '. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आम्ही न थकता, कोणत्याही वातावरणात, कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर न डगमगता, न डळमळता चालत असतो. तुम्हा सर्व प्रवाशांचे आशीर्वादच हो, दुसरं काय!!!
जसा कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, तसेच एस. टी. चे चालक व वाहक हे आमचे सारथी होऊन आपले कर्तव्य बजावत असतात. मेकॅनिक्स, चालक व वाहक हि दत्तरूपी त्रयी म्हणजे आम्हा एस. टी. बसेसचा मुख्य आधारस्तंभ. जसा घरातील करता पुरुष किंवा स्त्री आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी राबत असतो, तशी हि त्रयी आमच्यासाठी राबत असते. तुटपुंजे पगार, पुरेशी न मिळालेली विश्रांती, आरोग्याच्या विविध समस्या अशा अनेक बाबी असल्या तरी ते कर्तव्य बजावत असतात. किती तो मोठेपणा ! सोबत अधिकारी वर्गाचा देखील खारीचा वाटा. जसे तुम्हाला जगण्यासाठी अन्न पाणी लागतं; तसेच आमचे देखील एक निर्जीवरूपी सजीव जीवन. डीझेल, हवा, कुलंट, ऑईल वगैरे वगैरे गोष्टी. तसेच तुम्ही जसे आजारी पडता, तसेच आम्ही देखील बिघाड होऊन आजारी पडतो. पण आमचे डॉक्टर्स आम्हाला रिपेअर करून अगदी ठणठणीत करून पुन्हा तुमच्या सेवेत रुजू करतात. मग आम्ही पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होतो. चालक व वाहक तुम्ही आमच्याकडे यावे, आमच्यामध्ये बसून प्रवास करावा, ह्यासाठी अहोरात्र मेहनत करतात; बस स्थानकांवर घसा सुकेपर्यंत ओरडून ओरडून प्रवासी घेतात. जेव्हा तुमचे पाय आम्हाला लागतात; तेव्हा अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. का नाही वाटणार? तुमच्या सेवेलाच तर मी व माझ्या बहिणींनी वाहून घेतलाय स्वतःला!
माझी कथा पण तशी वेगळीच. माझा जन्म दापोडीचा. काय म्हणता, दापोडीत कुठे? जसे तुम्ही हॉस्पिटल मध्ये जन्मता, तसा माझा जन्म माझ्या इतर बहिणींसारखाच एस. टी. च्या दापोडी कार्यशाळेत झाला. तारीख काही मला माहित नाही, पण २०११ च्या शेवटी असेल कदाचित. मग माझ्या तिथे आमच्या बहिणी महाराष्ट्रातल्या विविध आगारांमध्ये जातात. म्हणजे आम्ही तुमच्यासारखेच सासरी देखील जातो बर का... तशी मी देखील गेले साताऱ्याला. सातारा आगारातील कर्मचारी माझा खूप लाड करायचे. अगदी मी अधिवेशनाला गेले होते त्यांच्यासोबत. तेव्हा त्यांनी मी काय सजावट केली होती सांगू तुम्हाला. माझ्या इतर बहिणी देखील माझ्या रूपावर १०० % जळाल्या असतील. खरंच, ' मीच माझ्या रुपाची राणी होते '. मी सातारा - स्वारगेट - सातारा ह्या विना वाहक, विना थांबा मार्गावर माझी सेवा बजावत होते तेव्हा.
अशीच सेवा करताना एक दिवस उगवला. २५ जानेवारी २०१२. साताऱ्याहून सकाळीच मी स्वारगेला जायला निघाले, आणि मी साताऱ्याच्या विना थांबा फलाटाला माझ्या सासरी पुन्हा जायला निघणार होते. प्रवाशांच बुकिंग तिकडे तिकीट खिडकीला चालू असलेलं पाहत होते. पण अचानक काय झालं, कोणास ठाऊक. मी अचानक चालू झाले, आणि बघते तर काय? मला जे चालक घेऊन आले होते, ते तर हे नव्हतेच. क्षणभर मला देखील कळले नाही, काय चालू आहे ते. आणि मी प्रवासी न घेता मार्गस्थ झाले. तशी सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी होती. पण मला मात्र चालवणारा चालक बेदरकारपणे चालवत होता. मला तर काहीच कळायला मार्ग नव्हता. तो कोणत्या मनःस्थितीत होता काय माहित. पण समोर जे येईल त्याचा अपघात करत, मागेपुढे न पाहता मी वाटेत जे येईल त्याला उडवत जात होते. काहीच कळायला मार्ग नव्हता. अनेक जण चिरडले गेले, अनेक वाहनांना धडक बसली, बरेच जण जखमी देखील झाले. आणि अचानक मी कशाला तरी धडकून थांबले. पोलिसांनी त्या चालकाला वाब्यात घेतले. पण तोपर्यंत माझे अतोनात नुकसान झाले. माझ्याकडून असे काही होईल, ह्याची ए अपेक्षा देखील केली नव्हती, माझ्यासाठी अतिशय काळा दिवस होता तो. संतोष माने असा त्या चालकाचा नाव. त्यांना काय झाले होते, हा काय प्रकार घडला, खरंच मला काहीच जाणीव नव्हती. तुमच्यात कसे लोक कोमा मध्ये जातात, तशीच काहीशी माझी गत झाली होती. मला आजूबाजूचं काहीच जाणवत नव्हतं. माझं आयुष्य आता संपलं का?
ह्या घटनेत एकूण ९ लोक मृत्युमुखी पडली असे कळले. अरेरे फार वाईट. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. माझे मलाच फार वाईट वाटत होते. हे काय होऊन बसले! मी देखील मृत्युशय्येवर होते. पुढे मग कार्यशाळेत मी कोपऱ्यात पडलेली असायचे. पण एके दिवशी माझी डागडुजी झाली, आणि मी थेट आले कोल्हापूर मधल्या संभाजीनगरला. माझ्या आयुष्याचा दुसरं अंक इथे सुरु झाला. पुन्हा एकदा ' प्रवाशांच्या सेवेसाठी ' सज्ज झाल्याचा अतोनात आनंद मला झाला. जुने सर्व काही विसरून, मी नव्या दमाने, त्याच पहिल्या त्वेषात सज्ज झाले. तुमची पावले मला धन्य धन्य करत होती.
ज्यांना माझ्या पूर्वायुष्याबद्दल कल्पना होती, ते मला संशयी नजरेने बघायचे. कित्येकदा असे देखील घडले कि काही चालक मला घ्यायला घाबरायचे. मला ' संतोष मानेची बस ', ' हीच ती खुनी बस ' वगैरे विशेषणे देखील लावली. खूप वाईट वाटायच हो तेव्हा. पण काही चालक न घाबरता, मला त्याच माझ्या पहिल्या दमात चालवायचे आणि मी आतल्या आत खुश व्हायचे. तसे मला ग्रामीण मार्गांवरच जास्त वापरले जायचे. पण ग्रामीण तर ग्रामीण! शेवटी प्रवाशांसाठी आपला उपयोग तर होत आहे, आपण पुन्हा आपले जुने आयुष्य जगत तर आहोत, हे जास्त आनंददायक होतं.
पण माझ्या नशिबी काय आले हे त्या ईश्वरास ठाऊक. काल मी रंकाळा - हुपरी - रंकाळा सेवा बजावत होते दुपार पासूनच. रमेश कांबळे हे माझे सारथ्य करत होते. तर तोडकर हे वाहक होते. हुपरीहून कोल्हापूरच्या दिशेने मी निघाले. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास पार्वती चित्रमंदिर रस्त्यावरून उमा टॉकीजमार्गे मी पुढे येत होते. एकंदर 30 प्रवासी होते माझ्यात. सिद्धिविनायक मंदिराजवळील थांब्यावर मी प्रवासी उतरवण्यासाठी थांबले. त्यानंतर चालक कांबळे यांनी मला सिग्नलच्या दिशेने पुढे नेले. माझ्या पुढे अनेक वाहने सिग्नलच्या प्रतीक्षेत होती. त्या वेळी फोर्ड कॉर्नर ते सुभाष रोड या मार्गावरील सिग्नल सुरू होता. या मार्गाकडे लाल सिग्नल असल्याने मी थांबणार याच अपेक्षेने तोडकर प्रवाशांकडे तिकिटाची चौकशी करत होते; मात्र अचानक चालक कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला. ते स्टेअरिंगच्या डाव्या बाजूला पडले. आणि माझ्यावरचा ताबा मात्र सुटला. तशी मी समोरील एक एक वाहनांना फरफटत नेऊ लागली. अरेरे, पुन्हा तेच चित्र  कोणाच्याही ध्यानीमनी नसताना पाठीमागून बसची ठोकर बसू लागल्याने वाहनचालकांनाही बाजूला होण्याचा अवधीच मिळाला नाही. अनेक वाहनांना माझी धडक बसली. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ जण माझ्याखाली सापडून गंभीर जखमी झाले. तर दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. पुन्हा एकदा तसाच प्रसंग घडला. मी तर खरेच अभागीच आहे. काय हे पुन्हा नशिबी आले. पण हा एक सांगते, आज माझ्या जागी जर दुसरी देखील बस असती, तरी कदाचित असा प्रसंग घडलाच असता. कारण आरोग्याच्या बाबतीत कोणी काही सांगू शकत नाही.

ह्या दोन्ही घटना एकच गोष्ट सांगतात, ते म्हणजे एस. टी. कामगारांच्या आरोग्याची झालेली वाताहत. वेळच्या वेळी आरोग्य तपासणी करणे किती गरजेचे आहे, हे ह्यामुळे दिसून येते. तसेच त्यांच्यावरील कामाचा तणाव कसा कमी करता येईल, हे लवकरात लवकर पाहणे गरजेचे आहे. आरोग्य जर व्यवस्थित असेल, तरच प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आपोआप वाढेल. आज माझ्या नशिबी असे आले, कांबळे काकांच्या नशिबी असे आले. पण उद्या कोणत्याही चालक किंवा वाहक आणि माझ्या बहिणींवर अशी वेळ येऊ नये, ह्याची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची आहे. त्यांनी ते टाळता कामा नये. कोणत्याही पादचाऱ्याचा, प्रवाशाचा हकनाक बळी जाऊ नये, हीच अपेक्षा मी करते. माझे पुढे काय होईल, मला काहीच माहिती नाही. पण असे दुर्दैव कोणाच्या वाट्याला ह्यापुढे येता कामा नये.
मीच एक अभागी, १५३२......

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.