अभयारण्याच्या घाटात एसटी - ओंकार ढावरे, ठाणे
अभयारण्याच्या घाटात एसटी
ते लकी होणं म्हणजे काय असतं ते म्हणतात नं ! तेच झालं. क्षणांसाठी गाडी अभयारण्याच्या घाटात थांबली आणि हौशी मनाचा मोह न आवरता गाडीचा हा फोटो काढण्याची संधी मिळाली.
सकाळी ०९१५ चे दरम्यान वाड्याला पोहोचेल असे नियोजन करून ठीक सकाळी ७ च्या सुमारास नितीन कंपनी जंक्शन (ठाणे) गाठले, कारण लवकर आणि स्वस्तात भिवंडी गाठायची म्हणजे टीएमटी उपक्रमाची मुलुंड - भिवंडी (८८ / आनंदनगर आगार) हाच एकच पर्याय. पण तिकडे त्या बस ची वाट बघून समजलं की ०७०५ ची गाडी रद्द झाली आणि तेव्हापासूनच मनाची घालमेल सुरु झाली, आता वेळेवर पुढे पोहोचेल की नाही? वगैरे वगैरे... ठीक ०७३५ ला ८८ क्रमांकाच्या गाडीचं आगमन झालं, आणि प्रवास सुरु झाला. मन चलबिचल होतच होतं, पण शेवटी टीएमटी वर विश्वास ठेवला आणि तो सार्थकी निघाला. ठीक ०८१५ च्या सुमारास गाडीनं भिवंडी एसटी स्थानक गाठलं आणि उतरतो न उतरतो तेवढ्यात समोरून महा. २० बी एल २७८१ (जव्हार आगार) ठाणे - जव्हार गाडी येताना दिसली, हात दाखवत गाडी थांबविण्याचा इशारा केला, आणि ती थांबली सुद्धा... आता सगळं काही ह्या बसवर अवलंबून होतं, आणि हिनेदेखील आपली कमाल दाखवली, अवघ्या तासाभरात गाडीने वाडा बसस्थानक गाठले. जिच्यासाठी एवढी चलबिचल सुरु होती ती समोरच दिसली, तेव्हा कुठे जीवात जीव आला. धावतपळतच ती गाठली. कदाचित ठाणे-१ ची गाडी गेली नसल्याने पुढे जाणारे बहुतांश प्रवासी ह्या गाडीला आले आणि भर म्हणजे नेहमीचे स्थानिक प्रवासी, त्यामुळे गाडी आधीच भरली होती, पण हिच्यातून प्रवास करायचाच होता त्यामुळे गाडीत शिरून मागे गेलो, आणि नेमकी शेवटच्या सीटवर एक जागा योगायोगाने झाली आणि नेमकी ती मला मिळाली. ठीक साडेनऊला गाडी मार्गस्थ झाली. पुढे परळीला सेकंड लास्ट सीट रिकामे झाले आणि तिकडे जाऊन बसलो.
आता ही एवढी धावपळ कोणासाठी केली! ती म्हणजे ***पालघर - अतिजलद - नंदुरबार*** (पालघर ते त्र्यंबकेश्वर सर्व थांबे घेत जात जरी असली तरी अतिजलद ह्यासाठी की सदर बस त्र्यंबकेश्वरपुढे फक्त मर्यादित थांबे घेते). वाड्यावरून विक्रमगड, जव्हार मार्गे न जाता, परळी - तानसा वन्यजीव अभयारण्यातून मार्गक्रमण करत अनेक लहान मोठ्या घाटातून निसर्गरम्य सफर ही गाडी पुढील २ तासात घडवते. नाशिक ठक्कर बाजार बसस्थानकाबाहेर रस्त्यावरच गाडीचे क्रू चेंज होतो.
आता वनक्षेत्रात रस्तेबांधणीला सुरुवात झाल्याने गाडीची सफर अधिकच रंजकदार वाटते. काही वर्षापूर्वी हिच्यातून अनावधानाने प्रवास झाला होता आणि माझा काहीही संबंध नसलेल्या ह्या गाडीची ओढ मला लागली. तेव्हापासून नाशिककडे जायचं किंवा यायचं झालं की माझी पहिली पसंती हिलाच असते. वनक्षेत्रात रस्ते बांधणी सुरु असल्याने, डांबरगाडी बाजूला होईपर्यंत आमची बस घाटात काही क्षणासाठी थांबली, तेव्हा काढलेला हा फोटो.
*** पालघर - अतिजलद - नंदुरबार ***
मार्गे मनोर, मस्तान नाका, हमरापूर, पोशेरी, पाली, वाडा, देसई, दाहे, मांडवा, बालशेत पाडा, धावरपाडा, चरणवाडी, परळी, उज्जेन फाटा, ओगडा, वडपाडा, तिळमाळ, गरमाळ, आमला, सुर्यमाळ, शेलमपाडा, दुधवाडी, गोमघर, खोडाळा, वाघ्याची वाडी, सावरपाडा, देवगाव फाटा, ढोलेवाडी, पारस आंबा, उमाची मेट, तलवाडा, दुबेवाडी, डहाळेवाडी, निरगुडपाडा, टाके हर्ष, असावली हर्ष, धाडोशी, भिलमाळ, खडकवाडी, पैना, त्र्यंबकेश्वर, नाशिक, द्वारका, ओझर, पिंपळगाव, देवळा, सटाणा, ताहराबाद, पिंपळनेर, साक्री ...
- पालघर आगार - पालघर विभाग -
@ तानसा वन्यजीव अभयारण्य
(नक्की वाचा)
ह्या वनक्षेत्रातुन खोडाळा आणि नाशिक बॉर्डर वरील देवगाव पर्यंतच्या मुख्य प्रवासासाठी दिवसभरात केवळ ३ गाड्या उपलब्ध आहेत. आणि ह्या तीन गाड्यांवर येथील जीवनमान अवलंबून आहे, ह्या तीन गाड्या म्हणजे पालघर - औरंगाबाद, पालघर - नंदुरबार आणि ठाणे - मोरचोंडी. परळी पर्यंत वाडा - परळी गांव हि स्थानिक गाडी तर नाशिक बॉर्डर देवगाव पासून इगतपुरी आणि नाशिक आगाराच्या स्थानिक गाड्या उपलब्ध आहेत. जर ह्या गाड्या सुटल्या तर मात्र वडाप किंवा एखाद्या वाहनाने लिफ्ट घेण्याशिवाय पर्याय नाही. सदर ३ही गाड्यांच्या जाण्या आणि येण्याच्या एकामागोमाग येण्याच्या अंतरात साधारण १ ते साडेचार तासाचा मोठा फरक आहे, आपत्कालीन सेवेचादेखील सदर ठिकाणी खूप मोठा अभाव असून ह्यापैकी एकजरी गाडी परळी आणि देवगाव भागामधील वनक्षेत्रात बंद पडली तर मात्र मोठी पंचाईत होणार हे नक्कीच. त्यामुळे जर घाई असेल तर ह्या मार्गाने अजिबात प्रवास करू नये, तुमच्याकडे वेळ, किंवा काही घाई नसेल तर मात्र हा एक चांगला पर्याय आहे.
- ओंकार ढावरे, ठाणे

Comments
Post a Comment