माझ्या आठवणीतील सहल - आदित्य भगत पेण
माझ्या आठवणीतील सहल
पाली, हरीहरेश्वर , दिवेआगर
सन २००७ साली आमची सहल श्रीक्षेत्र पाली, हरीहरेश्वर , दिवेआगर येथे जाणार होती. हि सहल जाण्यापूर्वी मी पाली आणि वाकण गावाच्या पुढचा परिसर पाहीला नव्हता त्यामुळे त्या परिसराचे आकर्षण होतेच पण लहानपणापासून एसटी आवडत असल्याने महाड, श्रीवर्धन आगाराच्या बसेसचेही आकर्षण होते. माणगाव ला तेव्हा आगार झाले नव्हते.
सहलीचा दिवस ठरला. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस रिमझिम सुरू होता. बस पेण शहरात महात्मा गांधी वाचनालयाजवळ लागणार होती. पहाटे ४.०० वाजता पोहोचायचे होते. मी माझ्या पालकांसमवेत ३.४५ लाच पोहोचलो. इतर सारे एक एक करून येत होते. आणि शेवटी जिची प्रतिक्षा करत होतो ती बस समोरून आली. एम एच २० डी ४९२७, मी आत चढून माझी आवडती सिट पकडली ती म्हणजे ड्रायव्हर काकांच्या मागची लांब सीट, त्या सीटवर पाय दुमडून समोर पाहण्याची मजाच वेगळी होती. इतर मुलांना घेण्यासाठी बस पेणहून खोपोली मार्गे पालीला जाणार होती. पाली फाट्यावर पोहोचेपर्यंत उजाडलं होतं. आणि बसने एक सुंदर वळण घेत खोपोली - पाली मार्गावर प्रवेश केला आणि खरंच काय सुरेख नजारा होता . एक बाजुने जंगल , मध्येच दिसणारी कौलारू घरांची गावे आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वतरांगा आणि सोबतीला धुकं आणि रिमझिम पाऊस. सुंदर निसर्ग नजारा पाहत पाहत पाली गांव केव्हा आलं कळलंच नाही.
पाली गावात बस भक्तनिवासाजवळ लावली गेली. अत्यंत प्रसन्नमय असे मंदिरात वातावरण निर्माण झाले होते. आम्ही साऱ्यांनी श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर पडलो. आणि तेवढ्यात मला पेण आगाराची पाली बसस्थानकातून चालवली जाणारी यु ए ९*** सिरीजची पाली - ठाकुरवाडी बस दिसली. त्या बसकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत होते आणि भानावर आलो तेव्हा पाहीले कि बहुतेक जण बसमध्ये बसले आहेत. बस पालीहून निघाली आणि वाकणमार्गे माणगाव मार्गाला लागली. सोबत पाऊस जोरदार असल्याने बाहेरचं फारसं काही दिसत नव्हतं. बसमध्ये देखील पावसाने काळोख वाटत होता. बसमध्ये गाण्यांच्या भेंड्या सुरू होत्या. मग माझं लक्ष गाण्यांच्या भेंड्यांकडे अजिबात नव्हतं. आणि ड्रायव्हर काकांच्या मागची सीट, आजुबाजुला हिरवी झाडे आणि सोबत पाऊस असल्यावर इतर गोष्टींकडे लक्ष जाणारच कसं
इंदापूरपर्यंत पाऊस होता मग माणगाव पासून पावसाने उघडीप दिली. माणगाव शहरात महाड आगाराच्या डी ५*** ने दर्शन दिले . बसवर फक्त माणगाव असा फलक होता. माणगाव शहरातून बस श्रीवर्धनच्या रस्त्याला लागली. पुन्हा एकदा सुंदर असा नजारा सुरू झाला . डोंगराळ रस्ते, रस्त्याच्या बाजूला असणारी आंब्याची झाडे आणि आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंब्यांचा खच, मला फारच कुतुहल वाटत होतं. ठिकठिकाणी लोकं बसला हात करीत होते आणि आम्ही ओरडून सहलीची बस आहे असं सांगायचो. पुणे घोणसे घाट लागला. सुंदर असा घाट आणि त्या घाटातून कौशल्याने बस चालवणारे ड्रायव्हर काका.... घोणसे घाटात एका वळणावर श्रीवर्धन आगाराची डी ५*** सिरीज ची बस बंद पडली होती. तिथे आमचे ड्रायव्हर काका आणि त्या बसचे ड्रायव्हर काका यांच्यात संवाद झाला. बस पुढे म्हसळा गावात आल्यावर श्रीवर्धन आगाराची ए क्यू ८*** म्हसळा - चिखलप - म्हसळा बस दिसली. म्हसळा गावात बसस्थानक नेमकं कोठे आहे ते समजलं नाही.
म्हसळा गावातून पुढे आल्यावर समोर नवीन नवखी श्रीवर्धन आगाराची एम एच २० डी ८२२६ श्रीवर्धन - ठाणे - भाईंदर दिसली. पुढे बसने श्रीवर्धन ऐवजी हरीहरेश्वर कडे वळण घेतलं. श्रीक्षेत्र हरीहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर बाजारात थोडी खरेदी केली आणि बस जेथे पार्क केली होती तेथे गेलो. पार्किंगच्या मागे समुद्र होता. मला आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. समुद्रात पाहत असतानाच अचानक कडकडाट झाला आणि आणि जोरदार आवाज करुन वीज समुद्रात कोसळली. मी घाबरून बसच्या दरवाजालाच मिठी मारली. आता एक ९ वर्षाचा मुलगा आणखी काय करणार होता म्हणा पण त्या क्षणी मला ती बस डी ४९२७ खूप आपली आणि जवळची वाटली. मी पहिल्यांदा एवढ्या जवळून वीज पाहीली होती.
पुढे आम्ही एका ठिकाणी घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. दिवेआगर गावाचा रस्ता पकडला. दिवेआगर गावात श्री सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर पडलो तेवढ्यात श्रीवर्धन आगाराची ए क्यू ८*** बस दिसली. पण कोठे निघाली होती ते कळलं नाही.
परतीचा प्रवास सुरू झाला. आता मात्र मीही गाण्यांच्या भेंड्यामध्ये भाग घेतला. माणगाव स्थानकात नाश्ता केला. माणगाव स्थानकात लागलेल्या चिपळूण आणि मंडणगड आगाराच्या लाल ग्रीलच्या बसेस फार सुंदर दिसत होत्या. पेणला पोहोचता पोहोचता उशीर झाला पण बस पेणला थांबण्याऐवजी दुरशेत गावातील मुलांना सोडण्यासाठी दुरशेत गावात थांबली. त्यानिमित्ताने दुरशेत गावात बस कोठे वळते हे समजलं. आणि त्यानंतर बस पेणला आली आणि सुंदर अशा प्रवासाची सांगता झाली.
नंतर डी ४९२७ ने एकदाच पेण ते नागोठणे असा प्रवास झाला. २०१० नंतर ही बस फारशी कोठे दिसलीच नाही. बहुतेक इतर आगाराला ट्रान्सफर झाली किंवा स्क्रॅपला गेली असावी. ह्या बसने कधीही न विसरता येणाऱ्या अशा आठवणी मनात ठेवल्या आहेत. ह्या बसचा फोटो शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण भेटलाच नाही. एकदा खोपोली बसस्थानकावरचा कोणीतरी लांबून काढलेला फोटो मिळाला होता पण नवीन फोन हातात आल्यावर तोही हरवला. आज डी ४९२७ चां फोटो जरी माझ्याकडे नसला तरीही खूप सुंदर आणि कधीही न विसरता येणाऱ्या अशा आठवणी आहेत आणि त्या कायम राहतील
आदित्य भगत
पेण
Comments
Post a Comment