आपली एसटी बदलांच्या उंबरठ्यावर

आपली एसटी बदलांच्या उंबरठ्यावर

बदल हा निसर्गाचा नियम आहे व बदल हीच या जगातील एकमेव शाश्वत गोष्ट आहे. आपल्या अवतीभवती विविध प्रकारचे बदल हे कायम होत असतात, कोणताही बदल हा सकारात्मक अथवा नकारात्मक अशा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. काही बदल हे नैसर्गिकरित्या होत असतात तर काही बदल घडवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. बदल कोणताही असला तरी बदलांना कमी अधिक प्रमाणात विरोध होतच असतो.

आपल्या सर्वांची लाडकी एसटी आणि तिच्या एकूणच कारभारात होणारे बदल ह्यांचे एक अतूट नाते आहे. एसटीच्या स्थापनेपासून आतापर्यंत असंख्य बदल झालेले आहेत. आता पर्यंत एसटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस प्रवासी सेवेसाठी वापरण्यात आल्या. अगदी सुरुवातीच्या बेडफोर्ड पासून आताच्या शिवनेरी शिवशाही पर्यंत अनेक विविध कंपन्यांच्या बसेस एसटीच्या ताफ्यात आहेत. एसटीचा सर्वात पहिला मार्ग पुणे -- अहमदनगर पासून एसटीमध्ये आता लांब, अतिलांब, मध्यम पल्ल्याचे बस मार्ग सुरु झाले. कालांतराने रातराणी बसेस सुद्धा सुरू झाल्या. अधिक आरामदायी प्रवासासाठी डिलक्स बसेस सुद्धा होत्या. आता वोल्वो तसेच स्कॅनिया कंपनीच्या शिवनेरी व अश्वमेध बसेस आपल्याकडे आहेत. जुनी छापील तिकिटे जाऊन आता तिकीट देण्यासाठी नवीन ETIM मशीन आल्या.

एसटीच्या ह्या प्रवासात एसटी महामंडळाचे एक फायद्यात असणारे महामंडळापासून सध्या एक कायम तोट्यात असणारे महामंडळ हा सुद्धा एसटीमध्ये झालेलं अनेक बदल आहे. सुमारे १९८० व १९९० चे दशक म्हणजे एसटीचा सुवर्णकाळ समजला जातो. त्याकाळात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये एसटीची मक्तेदारी होती आणि म्हणूनच एसटी फायद्यात होती. सुमारे २००० सालानंतर ज्याप्रमाणात खाजगी वाहतूक वाढत गेली त्याप्रमाणात एसटीचा तोटा वाढत गेला आणि आता प्रचंड संचित तोट्याच्या ओझ्याखाली आपली एसटी दबलेली आहे. एसटीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये झालेला हा एक फार मोठा बदल आहे.

पूर्वी एसटीमध्ये अध्यक्ष म्हणून एका स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करण्यात येत होती. म्हणजे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ही दोन्ही वेगळी पदे होती. मात्र काही वर्षांपूर्वी ह्या पद्धतीमध्ये बदल होऊन परिवहन मंत्री हे स्वतःच एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले.
पूर्वीच्या काळी मिळणारी रु. ५ व रु ७ ची आरक्षणे सध्या जवळपास बंद होऊन त्यांची जागा आता ऑनलाईन आरक्षणांनी घेतली आहे.

जेव्हा आपल्या एसटीमध्ये एशियाड बसेस सुरुवातीला आल्या तेव्हा त्यांना आतमध्ये पंखे तसेच पडदे सुद्धा होते. कालांतराने एशियाडच्याच्या अंतर्गत रचनेमध्ये बरेच बदल झाले. एशियाड बसेसचे हिरकणी असे नामकरण करण्यात आले. आता हिरकणी बसमध्ये नवीन पुशबॅक प्रकारातील आसनव्यवस्था बसविण्यात आली. आपल्या परिवर्तन बसेसमध्ये सुद्धा ३२ ऐवजी आता अधिक प्रशस्त अशी २२ आसनव्यवस्था बसविण्यात आली. तसेच सीटच्या कापडाचा रंग आधी हिरवा होता मग निळा आणि आता काळ्या रंगाच्या सीट्स आपल्या परिवर्तन बसेसमध्ये पाहायला मिळतात. एसटीच्या वाहतूक प्रकारांमध्ये आता विना - वाहक विना - थांबा तसेच शटल बसेसचा समावेश करण्यात आला.

अशा प्रकारच्या अनेक बदलांची उदाहरणे आपल्याला मांडता येतील. मागील काही वर्षांमध्ये एसटीमध्ये होत असलेल्या विविध बदलांचे प्रमाण चांगलेच वाढलेले आपल्याला दिसून येते. एकूणच आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच तंत्रज्ञानतील बदलांचा परिणाम आपल्या एसटीवर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच सध्याच्या काळातील एसटी संबंधित सर्व प्रकारच्या बदलांचा आढावा घेण्यासाठी आपण हा वाटाड्याचा विशेष अंक आपल्या समोर सादर करीत आहोत.

स्मार्ट कार्ड - काही वर्षांपूर्वी एसटीमध्ये पासेस देण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटीचे हे स्मार्ट कार्ड पोहोचले आहेत. विद्यार्थी पासेस तसेच नियमित प्रवास करणाऱ्यांसाठीचे पासेस आणि ४ व ७ दिवसांचे पासेस साठी हे स्मार्ट कार्ड देण्यात येतात. ह्या स्मार्ट कार्डचे प्रवासी, एसटी कर्मचारी व एसटीसाठी  बरेच फायदे आहेत. ह्या स्मार्ट कार्डच्या वापरामुळे प्रचंड प्रमाणात कागदाची बचत होणार असून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. स्मार्ट कार्डमुळे नवीन पास  देण्याची प्रक्रिया अतिशय जलद, साधी सोपी होणार आहे. त्यामुळे पास वितरण केंद्राच्या बाहेर लागणाऱ्या रांगा आता निश्चितच कमी होतील. पास  देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता विविध रजिस्टर मध्ये नोंदी कराव्या लागणार नाहीत त्यामुळे त्यांच्यावरील ताण बराच कमी होणार आहे. तसेच हे स्मार्ट कार्ड वापरण्यासाठी अतिशय सोपे आहेत. टिकाऊ आहेत. ETIM मशिन्सच्या साहाय्याने हे स्मार्ट कार्ड नोंदवता येतात. आता लवकरच एका विशिष्ट प्रकारच्या स्मार्ट कार्ड वापरून आपण त्यात आवश्यक तेवढ्या रकमेचा रिचार्ज करून त्यापासून तिकिटे काढू शकतो. त्यामुळे सुटे पैसे बाळगण्याच्या त्रासामधून प्रवासी तसेच वाहकांची सुटका होणार आहे. लवकरच ही योजना कार्यन्वित होणार आहे.

रा. प. कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेश आपली एसटी ज्यांच्या अथक मेहनतीमुळे अविरतपणे प्रवाशांची सेवा करते ते म्हणजे आपले एसटीचे सर्व कर्मचारी व अधिकारी होय. आपले एसटीचे कर्मचारी हे प्रवासी वाहतूक करण्याचे एक महत्वाचे काम करतात असतात. त्यांना एक वेगळी ओळख मिळण्यासाठी त्यांचा विशिष्ट असा गणवेश असणे अतिशय आवश्यक आहे. पूर्वी आपल्या एसटीमध्ये कमर्चाऱ्यांना गणवेश शिवून घेण्यासाठी भत्ता देण्यात येत होता. मात्र मागील वर्षी एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याचे प्रयत्न सुरु झाले. ह्या संदर्भात National Institute of Fashion Technology [NIFT] व जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधील तज्ञांची मिळून एक समिती गठीत करण्यात आली. ह्या समितीच्या अहवालानुसार एसटीतील चालक वाहक, मॅकेनिक इत्यादी पदांवरील कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारचे गणवेश निवडण्यात आले. हे गणवेश निवडताना कर्मचाऱ्यांना गणवेश परिधान करून काम करताना सहजता असावी, त्यांची सुरक्षितता असा अनेक बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. चालक वाहकांच्या गणवेशावर खास रिफ्लेक्टर पट्टी लावण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल येथे झालेल्या एका खास समारंभामध्ये ह्या नवीन गणवेशाचे अनावरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना केवळ कापड व शिलाई भत्ता न देता त्यांच्या मापाप्रमाणे तयार गणवेश शिवून देण्यात येणार आहेत. सर्व तयार गणवेश एसटीच्या  मध्यवर्ती भांडार विभागामध्ये जमा झालेले असून लवकरच त्यांचे विभागीय तसेच आगार पातळीवर वितरण करण्यात येणार आहे. ह्या नवीन गणवेशांमुळे आपल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा रुबाब अजूनच वाढणार हे नक्की.
शिवशाही बसेस एसटीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर सध्या होत असलेला बदल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु झालेल्या नवीन वातानुकूलित शिवशाही बसेस. शिवशाही बसेसबद्दल बरेच काही लिहिण्यासारखे आहे म्हणूनच त्यासाठी एक वेगळा लेख लिहिलेला आहे, कृपया पान क्रमांक वर वाचा.

MS Body  परिवर्तन बसेस आपल्या एसटीची बस म्हणजे एसटीच्या संपूर्ण कारभारातील एक अत्यंत महत्वाचा घटक होय. एसटी बसच्या संरचनेत बदल हे काळानुसार होत असतात. आपल्या एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे १८००० बसेस आहेत त्यामुळे बसची बांधणी करताना त्याचे डिझाईन करताना प्रचंड आवाक्याचा आणि एकूण बसेसच्या संख्यांचा विचार करावा लागतो. एसटी बसचे वजन, रस्त्यावरील वेग, बाह्य स्वरूप अशा अनेक बाबींचा विचार करता आपल्याकडे एसटी बसेस बांधणी करण्यासाठी प्रामुख्याने अल्युमिनियमचा वापर करण्यात येतो. एसटी बस बांधणी साठी जास्त टिकाउदार अशा Mild Steel चा वापर करण्याचे आणि एसटी बसची मजबुती वाढिवण्याचे बरेच प्रयत्न सूरु आहेत. याआधी आपल्या एसटीमध्ये काही MS Body च्या बसेस प्रायोगिक तत्वावर बनविण्यात आल्या होत्या. त्या बसेसचे चालन, मेंटेनन्स इत्यादी बाबींचा अभ्यास करून आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात आपल्या एसटीच्या तिन्ही मध्यवर्ती कार्यशाळांनी नवीन आकर्षक रचनेच्या बसेस बनविल्या आहेत. ह्या बसेसमध्ये नवीन अधिक आरामदायी आसने बसविण्यात आलेली आहेत. बसच्या आतमध्ये बसच्या मार्गाची माहिती मिळण्यासाठी डिजिटल मार्गफलक लावण्यात आलेला आहे. प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी बसला खास डिकी बसविण्यात आली आहे. तसेच बऱ्याच प्रवासीभिमुख बाबी ह्या नवीन बसमध्ये आहेत. CIRT व  ARAI अशा प्रतिथयश प्रथितयश संस्थांकडून सदर बसेसचे परीक्षण करून त्यात प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक बदल करण्यात आले आहेत.  सध्या तिन्ही कार्यशाळांमध्ये जुन्या बसेसच्या चेसिसवर ही नवीन बसबॉडी बांधणी सुरु आहे. ह्या नवीन बसबॉडीचा प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीतील वापर, प्रतिसाद मिळालेल्या सूचना इत्यादी बाबींचा विचार करून नंतरच नवीन चेसिसवर ह्या नवीन बसबॉडीची बांधणी होणार आहे. तसेच येत्या काळात आपल्या एसटीच्या कार्यशाळांमध्येच नवीन स्लीपर कोच बसेसची सुद्धा बांधणी होणार आहे. येत्या काळात आपल्या एसटीच्या परिवर्तन बसेसचा चेहरा बदलणार हे नक्की.

एसटीच्या टपावरून आता कॅरिअर गायब आपल्या एसटीच्या बसमध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे एसटीच्या टपावरील कॅरिअर. गणपती ज्यादा वाहतुकीच्या काळात तसेच उन्हाळी सुट्टीत गावी जाताना ह्या कॅरिअरच्या साहाय्याने भरपूर सामान गावी घेऊन जाणे शक्य होते. मात्र आता बस बांधणीच्या नवीन नियमांनुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसना करिअर ठेवण्यास परवानगी नाहीये. त्यामुळे एसटीच्या बसेसना कॅरिअर नसणे आता बंधनकारक आहे. प्रवासी वाहतुकीच्या बसेसची AIS ५२ ह्या कोडमध्ये दिलेल्या नियमावली प्रमाणे नवीन बस बांधणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार २०१५ नंतर बांधण्यात आलेल्या एसटीच्या बसेसना कॅरिअर नाहीये. आपली मध्यवर्ती कार्यशाळांना AIS ५२ ह्या कोड नुसार बस बांधणी करण्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आपल्या एसटीची ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. सदर कॅरिअरमुळे बऱ्याचवेळा क्षमतेपेक्षा जास्त सामान वाहून नेण्याचे प्रकार सुरु होते. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ही बाब अत्यंत धोकादायक होती. म्हणूनच कॅरिअर काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबदल्यात नवीन बस बांधणीमध्ये आपल्या एसटी बसेसना आता नवीन डिकी बसविण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या मोठ्या सामानाची वाहतूक करू शकतो. सदर बदल प्रवासी वर्गाच्या पचनी पडण्यास थोडा वेळ लागेल.

एसटीचे वेळापत्रक पाहण्यासाठी तसेच ऑनलाईन आरक्षणासाठी नवीन मोबाईल अप्लिकेशन सध्या स्मार्ट फोन्सचा जमाना आहे. आपण सर्वच जण ह्या स्मार्ट फोनचा वापर करीत असतो. अनेक सोयीसुविधांसाठी लागणारी विविध प्रकारची अप्लिकेशन्स आपल्या स्मार्ट फोनमध्ये असतात. अशावेळी आपल्या एसटीने सुद्धा प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन मोबाईल अप्लिकेशन सुरु केले आहे. ह्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व बसेसचे वेळापत्रक पाहू शकतो. ऑनलाईन तिकीट आरक्षण करू शकतो. ह्यामुळे आपल्याला बसल्या जागी कोणत्याही बसचे वेळापत्रक पाहता येते. सर्व वेळापत्रकाची माहिती एका क्लीकवर आपल्यासमोर उपलब्ध असते. प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात अशा प्रकारची माहिती प्रवाशांना मिळणे हे प्रवासी सोयीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.तसेच हे अप्लिकेशन वेळोवेळी अद्ययावत केले जाते. नवीन बसच्या वेळापत्रकाची माहिती सुद्धा ह्यात लगेच उपलब्ध करून दिलेली असते.  ह्यावरून प्रवासी सेवा पुरवण्यासाठी आपली एसटी कालानुरूप अनेक बदल करीत असते हे स्पष्ट होते.

एसटीची प्रादेशिक कार्यालये बंद बऱ्याच आधीपासून आपल्या एसटीमध्ये एसटी आगार - विभागीय कार्यालये - सहा प्रादेशिक कार्यालये - मध्यवर्ती कार्यालय अशी संरचना होती. एसटी प्रशासनाचे सुसूत्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मागील वर्षी आपल्याकडे सहा प्रादेशिक कार्यालये बंद करण्यात आली. काही वर्षांपूर्वी एसटीमध्ये सुधारणा सूचविण्यासाठी नेमलेल्या उपासनी समितीच्या शिफारशींनुसार सदर निर्णय घेण्यात आला. ह्यामुळे प्रादेशिक कार्यालयांमधील कर्मचारी आणि आस्थापनांवर होणारा खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली. तसेच आता विभागीय कार्यालयांना थेट मध्यवर्ती कार्यालयांशी संपर्क साधणे शक्य झाले आहे. सदर कार्यलयांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला एसटीच्या अन्य कार्यालयांमध्ये समाविष्ट करण्यात आले.  बसपोर्ट एसटीच्या संपूर्ण कारभारातील महत्त्वाचा घटक म्हणजे आपली बस स्थानके होय. एसटी मध्ये होणाऱ्या अनेक नवनवीन बदलांप्रमाणेच आपली बसस्थानके असणे गरजेचे आहे. त्यानुसार नियोजन करत आपल्या एसटीतर्फे महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये बसस्थानकाचा कायापालट करून नवीन बसपोर्ट उभारण्यात येणार आहेत ह्याबस पोर्टवर सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत. अनेक ठिकाणी बसपोर्टचे डिझाईन, निविदाप्रक्रिया, बांधकाम प्रगती पथावर आहे.


तर मंडळी अशा प्रकारे मागील काही काळामध्ये एसटीमध्ये अनेक बदल होत आहेत. तसेच येत्या काळात अनेक नवनवीन बदल प्रस्तावित आहेत.  ह्या बदलांना, त्यामागचा उद्देश नेमक्या पद्धतीने समजून घेणे, आणि सकारात्मक प्रतिसाद देऊन बदल आत्मसात करणे, त्याबाबतच्या काही नेमक्या सूचना संबंधित विभागाकडे देणे  हे सर्व एसटी प्रेमी व इति प्रवाशांचे कर्तव्य आहे. धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.