राजधानी दौरा (७ दिवसात , ७ राज्य व १ केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधान्या)

राजधानी दौरा
(७ दिवसात , ७ राज्य व १ केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधान्या) 

आपल्या महाराष्ट्र राज्याला जोडून एकूण ६ राज्य व १ केंद्रशासित प्रदेश आहे. या ६ राज्यात व एका केंद्रशासित प्रदेशात आपली एसटी अविरतपणे आपली सेवा पुरवत असते.विशेष म्हणजे या ६ राज्यांच्या व एका केंद्रशासित प्रदेशाच्या राजधान्यांमध्ये आपली एसटी सेवा पुरवते.तर मग पाहूया कोणकोणती राज्ये व कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत ते.. 

राज्यांची नावे राजधानी शहराचे नाव 
१) महाराष्ट्र ~ मुंबई 
२) गुजरात ~ गांधीनगर - अहमदाबाद
३) मध्यप्रदेश ~ भोपाळ 
४) छत्तीसगड ~ रायपूर
५) तेलंगणा ~ हैद्राबाद 
६) कर्नाटक ~ बेंगळुरू 
७) गोवा ~ पणजी

केंद्रशासित प्रदेश :
८) दादरा व नगर हवेली ~ सिल्वासा 

* राजधानी दौऱ्याची संकल्पना :

राजधानी दौऱ्याची संकल्पना ही पुर्णपणे आपल्या ग्रुपचे अॅडमीन स्वप्नील पाटील सर यांची आहे.कारण या आधी म्हणजेच २०१२ साली त्यांनी अशा प्रकारचा प्लॅन केला होता (ज्याचा सविस्तर लेख स्वप्नील पाटील सर यांनी आपल्या ग्रुपच्या २०१७ च्या वाटाड्या अंकात लिहिला आहे).

वरील सर्व ८ राजधानी शहरे फिरण्यासाठी मला ७ दिवस लागले.या राजधानी दौऱ्याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे 
१) सदर प्लॅनमध्ये ७ राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाचा दौरा होतो. 
२) आपल्या एसटीने ७ दिवसात करता येणारा हा सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास आहे. 
३) सदर दौऱ्यात चारही दिशांकडील ज्या टोकाच्या ठिकाणांपर्यंत आपली एसटी जाते तेथे आपल्याला जाता येते. { पश्चिम - मुंबई व अहमदाबाद , उत्तर - भोपाळ , पूर्व - रायपूर , दक्षिण - बेंगळुरू } 


सविस्तर प्लॅन :

२०१२ साली स्वप्नील पाटील सर यांनी राजधानी दौरा हा गोव्याची राजधानी पणजी येथून सुरू केला होता आणि सिल्वासा येथे त्याचा शेवट केला होता. आता हाच प्लॅन उलटा म्हणजेच सिल्वासा पासून सुरवात करून पणजीला शेवट करायचा असा विचार करून स्वप्नील सरांनी प्लॅन तयार केला व मला सांगितला कारण हा प्लॅन आम्ही दोघे मिळून करणार होतो परंतू काही कारणांमुळे स्वप्नील सरांना वेळ नसल्यामुळे त्यांना हा प्लॅन करणे शक्य नव्हते. याउलट मला याच काही दिवसात वेळ होता , पुढे वेळ मिळेल की नाही ही शंका होती त्यामुळे मी सदर प्लॅन करायचे ठरवले. सदर प्लॅनमध्ये ८०% प्रवास हा आपल्या महाराष्ट्राच्या एसटी बसने , १९% प्रवास हा रेल्वेने तर १% प्रवास हा गुजरातच्या बसने होणार होता. त्या रितीने स्वप्नील सरांकडून संपुर्ण प्लॅन समजून घेतला कारण काही ठिकाणी जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची एकच बस आहे (उदा. अमरावती - भोपाळ , नागपूर - रायपूर) त्यामुळे यात थोडी जरी चूक झाली तरी संपूर्ण प्लॅन फेल जाऊ शकतो त्यामुळे सर्व बसेसचे व रेल्वेचे टायमिंग सतत चेक करून फायनल प्लॅन तयार केला.

प्लॅन तर फायनल झाला पण आता प्रश्न होता तो म्हणजे ७ दिवसाच्या आंतरराज्य पासचा ? कारण बहुतांश ठिकाणी ४/७ दिवसांचे फक्त महाराष्ट्र राज्या पुरताच मर्यादित असणारे शिवशाहीचे पासेस मिळतात. आपल्या ग्रुपचे अॅडमीन संकेत मोरे यांनादेखील काही कामानिमित्त चंदगड ला जायचे असल्याने त्यांनी मुंबई सेंट्रल व कुर्ला ने.न. येथे आंतरराज्य शिवशाही पासची विचारणा केली असता शिवशाहीचे पासेस आहेत पण आंतरराज्य चे पासेस नाहीत असे कळले , मी सुद्धा अलिबाग ला व स्वप्नील सरांनी पनवेल ला विचारले असता हेच उत्तर मिळाले. आता आंतरराज्य पासचा मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला कारण आंतरराज्य पासच नसेल तर राजधानी दौरा होणे अशक्यच. विचार करत असता अचानक डोक्यात विचार आला की आंतरराज्य पास कुठेही नाही मिळाला तरी ठाणे स्टेशनला मिळू शकेल कारण काही महिन्यांपूर्वी संपूर्ण मुंबई डिव्हिजनमध्ये स्मार्टकार्ड नव्हते पण ते ठाणे स्टेशनला होते. क्षणाचाही विलंब न करता ठाणे स्टेशनला पासची चौकशी करण्यासाठी आपल्या ग्रुपचे ठाणे स्टेशनची शान असलेले मेंबर जितेंद्र मालुसरे यांना मेसेज केला आणि योगायोगाने ते त्याच दरम्यान ठाण्याला चालले होते. ठाणेला पोहचल्यावर चौकशी करून कळवतो असा मेसेज त्यांनी मला केला , तोपर्यंत माझ्या मनात सारखे विचार येऊ लागले की ठाणे स्टेशनला पास मिळेल की नाही ? आपला प्लॅन पुर्ण होईल की नाही ? वैगरे वैगरे....... आणि थोड्या वेळाने जितेंद्र सरांनी स्वत: फोन करून ठाणे स्टेशनला आंतरराज्य पासेस आहेत असे कळविले , एवढे ऐकून माझा जीव अगदी भांड्यात पडला. जितेंद्र सरांचे फोनवर आभार मानून पुढील कामाला म्हणजेच प्लॅन कोणत्या तारखेपासून करायचा हे ठरवायला सुरूवात केली कारण इतर गाड्या रेग्युलर होत्या पण मुंबई-बेंगळुरू ही गाडी आता फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवारीच मुंबई येथून सुटत असल्यामुळे त्या वारानुसार प्लॅन च्या तारखा अॅडजेस्ट करायला सुरुवात केली.तारखा फिक्स करून प्लॅन स्टार्ट करायच्या आदल्या दिवशी पास आणि रिझर्वेशन काढायचे ठरविले. 


दि. १०/१२/१८ (प्लॅन स्टार्ट होण्याचा अगोदरचा दिवस) 

अलिबाग वरून प्लॅनवर लागणाऱ्या आवश्यक वस्तू घेऊन सर्वप्रथम पनवेल गाठले आणि त्या नंतर पास काढण्यासाठी दुपारपर्यंत ठाण्यात पोहोचलो. ठाण्यात आपले ग्रुप मेंबर पंकज कारंडे सर यांची भेट घेऊन ७ दिवसांचा आंतरराज्य पास काढला व एक रिझर्वेशन काढले व बाकी रिझर्वेशन परळ येथे जाऊन काढले.रिझर्वेशन काढून पुन्हा पनवेल येथे आलो. व राञी सर्व आवश्यक त्या वस्तू घेऊन खऱ्या अर्थाने प्लॅन ला सुरूवात केली.

{१ ली राजधानी ~ मुंबई } 
मुंबई सेंट्रल हून वापी करीता रात्री १०.४० ची ट्रेन असल्यामुळे सर्वप्रथम मुंबई सेंट्रल बसस्थानकावर जाऊन मग रात्री १०.४० ची मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेंजर पकडली. 

दि. ११/१२/१८ {७ दिवसांचा आंतरराज्य पास सुरु} 

पहिली राजधानी म्हणजेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाल्यानंतर आता दुसरा टप्पा होता तो म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची राजधानी सिल्वासा येथे पोहचण्याचा. मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेंजर नी रात्री ३.३० वाजता वापी स्टेशन वर पोहचलो व तेथून चालत १० मिनिटात बरोबर ३.४० ला वापी बसस्थानकात. आता वापीवरून सिल्वासा जाण्यासाठी रात्री एकच सीटर गाडी होती ती म्हणजे धुळे - सेलवास व बाकी सर्व स्लीपर कोच होत्या. धुळे - सेलवास हीच धुळे वरून संध्याकाळी ७.०० च टायमिंग आहे त्यामुळे ही गाडी वापीवरून कधीच गेली असेल या अंदाजाने वापी बसस्थानकावरील एका बाकड्यावर जाऊन बसलो. तेवढ्यात ४.०० च्या दरम्यान एकदम जोरात बस थांबल्याचा आवाज आला. ही गाडी आपल्या महाराष्ट्राचीच असेल असा अंदाज लावून पहायला गेलो तर खरच ती आपल्या महाराष्ट्राची गाडी धुळे - वापी होती. ह्या गाडीची धुळे वरून सुटण्याची वेळ रात्री ८.१५ ची आहे. ८.१५ ची धुळे - वापी बस आली म्हटल्यावर ७ ची धुळे - सेलवास बस कधीच गेली असेल असा अंदाज लावला पण आपल्या महाराष्ट्राची गाडी म्हणजे जणू काही स्पीड मशीनच , कारण बरोबर ४.३० वाजता गुजरातच्या धुळे - सेलवास गाडीने वापी बसस्थानकात प्रवेश केला. जवळजवळ १.१५ तासानंतर सुटलेली आपल्या महाराष्ट्राची गाडी गुजरातच्या गाडीपेक्षा ३० मिनिटे आधी आली होती. (गुजरातच्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता बरे ** असो). पुढे धुळे - सेलवास गाडीने सेलवास ला सकाळी बरोबर ५.०५ ला पोहोचलो. {२ री राजधानी ~ सिल्वासा} 
सिल्वासा नंतर दुपारी ३.३० पर्यंत अहमदाबादला पोहोचायचे असल्याने सिल्वासा येथून वापीला आलो. वापीला फ्रेश होऊन मग थेट वापी रेल्वे स्टेशन गाठले व वापी वरून ८.४५ ची मुंबई - अहमदाबाद (Gujarat SF Express) पकडली. Gujarat SF Express नी अहमदाबादला दुपारी बरोबर २.४५ ला पोहचलो. {३ री राजधानी ~ अहमदाबाद}
आपल्या महाराष्ट्राची गाडी म्हणजेच अहमदाबाद-औरंगाबाद दुपारी ४.१५ ची असल्यामुळे थोडा वेळ होता. अहमदाबादला फॅनिंग केली व ४.१५ ची आपली अहमदाबाद-औरंगाबाद बस पकडली. हायवेला लागल्यावर औरंगाबादच्या गाडीने खरे रंग दाखवायला सुरूवात केली  , गुजरातच्या गाड्यांना तर अगदी सहज मागे टाकत होती. दरमजल करत सकाळी ठीक ३.४५ ला मी धुळे बसस्थानकात पोहोचलो. 

दि. १२/१२/१८

धुळ्याला सकाळी ३.४५ ला पोहोचल्यावर अंघोळ वगैरे करून धुळ्याला सकाळची फॅनिंग करण्यासाठी तयार झालो. सकाळची फॅनिंग केल्यानंतर पुढचा टप्पा होता तो म्हणजे रात्रीपर्यंत इंदौरला पोहोचायचे होते. त्यासाठी सकाळच्या नाशिक-इंदोर बसचे शिरपूर ते इंदौर असे रिझर्वेशन केले होते पण अचानक एका वैयक्तिक कामामुळे प्लॅनमध्ये औरंगाबाद नसतानाही औरंगाबादला जाणे झाले. इंदौरला जायचे म्हटल्यावर पुन्हा धुळ्याला यावेच लागणार होते त्यामुळे औरंगाबाद वरून अंबड-धुळे ही बस पकडून धुळेला दुपारी १.०० वाजता आलो.चौकशी केल्यानंतर समजले की धुळेवरून इंदौरला जायला २.३० नंतर येणारी पुणे-इंदौर ही बस होती , तसेच याआधी आपल्याच ग्रुपवर आलेला जामखेड आगाराच्या गाडीचा फोटो म्हणजे चोंढी-इंदौर. पण सदर गाडी चालू आहे की नाही हे माहीत नव्हते. तेवढ्यात तेथे अहमदनगर विभागाची गाडी आली परंतू ती कोपरगाव आगाराची बस असून तीला कोपरगाव-धुळे असा बोर्ड होता.काही वेळानंतर म्हणजेच बरोबर २.४५ वाजता पुणे-इंदौर गाडीने धुळे बसस्थानकात प्रवेश केला. दुपारी १२.०० च्या धुळे-इंदौर गाडी नंतर सेंधवा,इंदौर दिशेला एकही गाडी नसल्यामुळे आमची गाडी जवळजवळ ७०-७५% भरली व १५ मिनिटातच आम्ही धुळे बसस्थानकातून निघालो. गाडी लाॅक असल्यामुळे ७० च्या वर काही जाईना , धुळे ते शिरपूर या एका तासाच्या अंतराला पुणे-इंदौर गाडीने जवळजवळ दीड तास लावला. शिरपूरला आम्ही बरोबर ४.३० वाजता पोहचलो. शिरपूरलाला गेल्यानंतर पाहतो तर काय ? पुणे-इंदौर च्या अगोदर धुळ्याला आलेली कोपरगाव आगाराची बस ? कारण कोपरगाव-धुळे बसचा शिरपूरला येण्याचा काहीच संबध येत नाही. कोपरगावच्या गाडीजवळ गेलो असता कोपरगाव आगाराचे वाहक काका इंदौर-इंदौर म्हणून ओरडत होते आणि गाडी देखील बऱ्यापैकी खाली असल्यामुळे मी पुणे-इंदौर सोडून कोपरगाव आगाराच्या बसने जाण्याचा निर्णय घेतला. कोपरगाव आगाराची गाडी इंदौरला कशी काय ? कोपरगाव आगाराकडून जामखेडला गाडी ट्रान्स्फर तर नसेल ? असे अनेक प्रश्न मनामध्ये घर करू लागले म्हणून पुढे काही अंतर गेल्यावर कंडक्टर काकांच्या बाजूची सीट रिकामी असल्यामुळे तेथे जाऊन गाडीची माहिती काढली असता असे समजले की चोंढी-इंदौर गाडी बंद झाली आहे व त्या गाडीच टायमिंग आता कोपरगाव आगाराला देण्यात आले आहे म्हणजेच कोपरगाव हून ती गाडी पहिले शिर्डीला जाणार व तेथून शिर्डी-इंदौर , असा तीचा मार्ग होता. गाडी सुरू होऊन फक्त २ दिवस झाले होते म्हणून गाडीला बोर्ड नव्हता. ड्रायव्हर व कंडक्टर काका दोघेही प्रथमच इंदौरला जाणार असल्याने दोघांनाही रस्ता माहिती नव्हता म्हणून मग शिरपूर ते धमनोद पर्यंत म्हणजे जवळपास १३० कि.मी आम्ही GOOGLE MAP च्या सहाय्याने गेलो व तेथील एका हाॅटेल वर गाडी जेवणासाठी थांबली , आमची जेवणे आटोपत असतानाच मागून पुणे-इंदौर बस आली व यापुढे आपण याच बसच्या मागोमाग जाऊ असा निर्णय आमच्या चालक/वाहक काकांनी घेतला व दरमजल करत आम्ही ठीक रात्री १०.१५ वाजता इंदौरला पोहचलो. इंदौरला आपल्या वस्तीला असलेल्या बसेसचे फोटो काढून मग भोपाळला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे प्रस्थान केले. इंदौर हून रात्री ११.४५ ची इंदौर-भोपाळ एक्स्प्रेस पकडली व इंदौरचा निरोप घेतला. 

दि. १३/१२/१८
{४ थी राजधानी ~ भोपाळ} 

इंदौर-भोपाळ एक्स्प्रेसने सकाळी ठीक ५.४५ ला भोपाळ येथे पोहचलो. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून आपली फक्त एकच गाडी सुटते आणि ती म्हणजे भोपाळ-अमरावती. भोपाळ-अमरावती च भोपाळ येथून सकाळी ७.०० च टायमिंग आहे त्यामुळे माझ्याकडे १.१५ होता , त्या वेळात अंघोळ व नाश्ता करून भोपाळच्या नादरा बसस्थानकाकडे जाण्यास निघालो (आपली भोपाळ-अमरावती गाडी ही भोपाळच्या नादरा बस स्थानकातून सुटते). नादरा बसस्थानकाकडे जातानाच वाटेत अनपेक्षितपणे आपली गाडी रात्री जिथे वस्तीला असते ती जागा दिसली , ड्रायव्हर काकांना विचारून त्या पार्किंगच्या जागेवरच बसून आम्ही मग नादरा बसस्थानकावर आलो. भोपाळ बसस्थानकावरच आमची गाडी जवळजवळ ८०% भरली. भोपाळ शहरामधलेच ४-५ थांबे घेतल्यानंतर आता तर आमची गाडी १००% भरून पहिल्या सीट पासून ते अगदी शेवटच्या सीट पर्यंत माणसे ऊभी होती. मला वाटले होशंगाबाद अथवा इटारसी पर्यंत गाडी खाली होईल पण असे काहीच झाले नाही उलट गाडी अजून भरतच गेली. भोपाळ ते वरूड पर्यंत आमची २×२ ची सीट २×३ होती (म्हणजेच आम्ही ३ जण त्या सीट वर बसलो होतो ). वरूडला उतरते वेळी कंडक्टर काकांना सहजच विचारले की, आजची कॅश किती जमा झाली ? त्यांनी सुद्धा अगदी अभिमानाने सांगितले २५,०००. भोपाळ-अमरावतीने वरूडला उतरलो. थोडीफार फॅनिंग करून जलालखेडा-काटोल करत रात्रीपर्यंत नागपूरला पोहचलो. आता पुढची राजधानी होती ती म्हणजे छत्तीसगडची राजधानी रायपूर. रायपूरला पोहोचण्यासाठी नागपूरच्या इतवारी जंक्शन वरून रात्री ९.१५ ची इतवारी-टाटानगर (पॅसेंजर) पकडायचे नियोजन होते व त्याप्रमाणे ती ट्रेन मिळाली सुद्धा पण काही कारणास्तव त्याच दिवशी ट्रेन नेमकी १.३० तास उशिराने सुटली. ९.१५ ची ट्रेन १०.४५ ला सुटल्यामुळे तिचे पुढील वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले. 

दि. १४/१२/१८

इतवारी-टाटानगर (पॅसेंजर) रायपूरला आपल्याला वेळेत पोहचविणार नाही याची खात्री झाल्यावर मग मी गोंदिया स्टेशन वर उतरून मागून येणारी इतवारी-बिलासपूर (एक्स्प्रेस) पकडायचा निर्णय घेतला. इतवारी-बिलासपूर (एक्स्प्रेसने) रायपूरला बरोबर सकाळी ६.०० वाजता पोहचलो. {५ वी राजधानी ~ रायपूर} 
रायपूरला पोहोचल्यावर फ्रेश वगैरे होऊन थेट पंडरी बसस्थानक गाठले (रायपूर च्या पंडरी या बसस्थानकावरून आपली एकमेव असलेली रायपूर-नागपूर ही गाडी सुटते). बरोबर ७.०० वाजता आम्ही रायपूर वरून निघालो. भिलाई, दुर्ग, राजनांदगाव करत आम्ही आपल्या महाराष्ट्रात प्रवेश केला व पहिले बसस्थानक लागले ते म्हणजे देवरी. देवरी म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील सर्वात शेवटचे बसस्थानक होय. देवरी बसस्थानकापासून अगदी १० कि.मी वर छत्तीसगड राज्य सुरू होते. देवरी येथे नाश्ता करण्यासाठी १५-२० मिनिटे गाडी थांबल्याने मला देखील फॅनिंग करण्याची मस्त संधी मिळाली. नाश्ता करून मग आम्ही साकोली, भंडारा करत दुपारी २.०० वाजता नागपूरला पोहचलो. 
पुढे नागपूरला थोडी फॅनिंग करून नागपूर-यवतमाळ (नाॅन स्टॉप) पकडण्याचे नियोजन होते पण ३ वाजत आले तरीदेखील यवतमाळ (नाॅन स्टॉप) गाडी काही येईना. शेवटी ३.१५ ची नागपूर-पुसद गाडी पकडली 
व आमचा प्रवास सुरू झाला पण काही अंतर पुढे गेल्यावर अजून एक संकट समोर येऊन ठेपल ते म्हणजे कंडक्टर काकांच्या मशिन मध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे गाडी पुढे जाणार नाही असे सांगून रस्त्याच्या एका साईडला गाडी थांबवली. आता काय करावे कारण रात्री ८ पर्यंत यवतमाळला पोहोचणे गरजेचे होते नाहीतर पुर्ण प्लॅन फेल गेला असता. खूप वेळ झाला तरी यवतमाळ कडे जाणारी एकही गाडी येत नव्हती. शेवटी ४.१५ वाजता नागपूर-उमरखेड गाडी कशीबशी भर रस्त्यात थांबवली व यवतमाळ कडे जाण्यासाठी तेथून एकदाचा निघालो. यवतमाळला ठीक ७.५० ला पोहचलो व पहिले चौकशी कक्ष गाठले. अमरावती-हैद्राबाद गाडी गेली का ? असे विचारले असता समोरून "नाही" असे उत्तर मिळाले. हे ऐकून जीव अगदी भांड्यात पडला. यवतमाळला फॅनिंग करताकरताच आमची अमरावती-हैद्राबाद गाडी आली व १५ मिनिटात म्हणजेच ८.३० वाजता आम्ही हैद्राबाद कडे निघालो. 

दि. १५/१२/१८

अमरावती-हैद्राबाद ने सकाळी ठीक ५.२० ला हैद्राबादला पोहचलो. {६ वी राजधानी ~ हैद्राबाद} हैद्राबाद वरून सकाळी ७.१५ ची हैद्राबाद-बारामती पकडण्याचे नियोजन होते परंतु अमरावती-हैद्राबादने लवकर पोहचल्यामुळे ६.०० ची हैद्राबाद-सोलापूर (शिवशाही) पकडायचे ठरविले. त्यानुसार अंघोळ वैगरे करून फॅनिंग साठी हैद्राबाद बसस्थानकात सज्ज झालो. हैद्राबादला फॅनिंग करून ६.०० ची हैद्राबाद-सोलापूर गाडी पकडली. हैद्राबाद-सोलापूर गाडीने मी अंदाजे १.०० पर्यंत सोलापूरला पोहचणार होतो परंतु मला तर सोलापूरहून संध्याकाळी ४.३० ची उस्मानाबाद-बेंगळुरू गाडी पकडायची होती त्यामुळे हैद्राबाद ते सोलापूर असे सरळ न जाता हैद्राबाद-सोलापूर गाडीने मी उमरगा येथे उतरलो. उमरगाला फॅनिंग केली व कलबुर्गी (गुलबर्गा)-जालना नी औसा ला आलो. औसा ला थोडा वेळ थांबून मग पुढे तुळजापूर करून संध्याकाळी बरोबर ४.०० वाजता सोलापूरला पोहचलो. सोलापूरला काही वैयक्तिक कामामुळे आपल्या ग्रुपचे मेंबर पुष्कर डिंगरे सर येणार होते. सोलापूरला त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत भरपूर फॅनिंग केली. फॅनिंग करताकरता वेळ कसा गेला कळलेच नाही. इकडे ५.०० वाजून गेले तरी उस्मानाबाद-बेंगळुरू चा काहीच पत्ता नव्हता. शेवटी कंटाळून उस्मानाबाद आगारात फोन लावून चौकशी केली असता समजले की काही कारणांमुळे दुपारी ३.०० ची गाडी तब्बल १.३० तास लेट म्हणजे ४.३० ला सुटली होती. पण उस्मानाबाद आगाराचे चालक म्हणजे  , ४.३० ला गाडी सुटून देखील सोलापूरला गाडी फक्त १.१५ तासात आली होती . ठीक ६.०० वाजता आम्ही सोलापूर बसस्थानकातून बंगलोर करीता रवाना झालो. सोलापूरच्या २-३ ठिकाणांहून पॅसेंजर घेऊन आता खरी आमची गाडी हायवेला लागली. हायवेला लागल्यावर गाडीने स्पीड पकडला तो डायरेक्ट ८५ च्या पुढेच  विजापूर, इलकल, हॉस्पेट, चित्रदुर्ग करत सकाळी बरोबर ७.३० ला कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे पोहचलो. 

दि. १६/१२/१८
{७ वी राजधानी ~ बेंगळुरू} 

बंगळुरू ला पोहचल्यावर अंघोळ करून बंगळुरू दर्शन करण्यास सज्ज झालो. याआधी ३ वेळा बंगळुरूला येऊन गेलो असल्यामुळे कुठून कुठे कसे जायचे याची थोडीफार माहिती होती त्यानुसार दुपार पर्यंत बंगळुरू फिरून पुन्हा मॅजेस्टिक बसस्थानकात आलो. त्याचवेळी बसस्थानकात आपल्या गाड्यांचे फोटो काढताना एक मुलगा दिसला. त्याला भेटल्यानंतर समजले की तो सुद्धा एक बस फॅन असून तो GOV.BUSES OF INDIA या ग्रुपला अॅड  होता. रविवार असल्यामुळे त्याचा तो बस फॅनिंगचा दिवस होता  आणि मलाही ३.०० वाजेपर्यंत फिरण्याखेरीच काही काम नसल्यामुळे मी देखील कर्नाटकच्या शहरी व लांब पल्ल्याच्या बसेसची माहिती घेण्यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक बस फॅनिंग झाल्यानंतर पुन्हा मॅजेस्टिक बसस्थानकात आलो व आपली बंगळुरू-मुंबई गाडी पकडली. व कर्नाटकची राजधानी बंगळुरू चा निरोप घेतला. 

दि. १७/१२/१८

७ राजधान्या झाल्यानंतर आता फक्त राहिली होती ती म्हणजे गोव्याची राजधानी पणजी. त्यासाठी बेळगावला उतरून आंबोली, सावंतवाडी मार्गे पणजीला जाण्याचे नियोजन होते. त्याप्रमाणे चित्रदुर्ग, दावणगेरे करत आम्ही निघालो. हावेरीनंतर मात्र आमच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली ती म्हणजे हुबळी च्या मागे फक्त १० कि.मी असताना १.१५ वाजता हायवेवर आमच्या गाडीचा डावीकडील पुढचा टायर पंक्चर झाला. कोल्हापूर आगाराचे वाहक व दोन्ही चालक काका जॅक लावायचा अथक परिश्रम करत होते पण जॅक काही लागेना. गाडीतले प्रवासी देखील कोणी सामान आण तर कोणी मोबाईलच्या टाॅर्च ची लाईट दाखवून मदत करत होते. रात्रीचे २.३० वाजले तरी १०% सुद्धा काम झाले नव्हते. नशीबाने आमच्या मागे एक ट्रॅव्हलस वाला थांबला. काही प्रवाशांनी लगेचच त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडील जॅक देण्याची विनंती केली. आणि अखेरीस तो ट्रॅव्हलस वाला आमच्या मदतीस धावून आला. त्याने फक्त जॅकच दिला नाही तर टायर काढण्यापासून ते स्पेअर टायर लावण्यापर्यंत स्वत:हून मदत केली आणि एकदाचा गाडीला नवा टायर लागला . घड्याळात पाहिले तर रात्रीचे ३.०० वाजत आले होते. आता तर मला बेळगावला पोहोचणे तळ्यात-मळ्यात वाटू लागले कारण बेळगावला पोहचण्यासाठी अजून तरी २.१५ तास लागणार होते. कसेबसे करत ५.२० वाजता आम्ही बेळगाव बसस्थानकात पोहोचलो व नशीबाने ५.३० ची देवगड गाडी मिळाली. देवगड बसने ८.३० वाजता सावंतवाडीला उतरलो व लगेचच ८.३० ची सावंतवाडी-पणजी गाडी पकडून बांदा, पेरनीम, म्हापसा करत बरोबर १०.३० ला पणजी बसस्थानकात पोहोचलो. {८ वी राजधानी ~ पणजी} 
पणजीला पोहोचल्यावर फ्रेश व नाश्ता करून ११.०० ची पणजी-कोल्हापूर बस पकडली. पणजी-कोल्हापूर ने सावंतवाडीला उतरून लगेचच सावंतवाडी-रत्नागिरी बसने हातखंबा पर्यंत जायचे ठरविले.कुडाळला आपले ग्रुप मेंबर सौरभ पाटकर सर यांची भेट घेतली व कणकवली, तरळा, खारेपाटण करत राजापूरच्या जवळपास आलो. राजापूर च्या जवळ असताना ORS पाहत असताना पहिले की भालावली-मुंबई चे राजापूर ला टायमिंग ४.५० चे आहे व आमची गाडी देखील त्याच टायमिंग ला राजापूर ला पोहचणार होती. राजापूर ला पोहोचल्यावर भालावली-मुंबई गाडी फलाटावर लागलेलीच होती. मग कंडक्टर काकांना सांगून सावंतवाडी-रत्नागिरी गाडीचा निरोप घेतला व भालावली-मुंबई गाडी पकडली. माझा ७ दिवसांचा पास १२.०० वाजता संपणार असल्यामुळे कंडक्टर काकांनी माझा पास महाड पर्यंत पंच केला.पुढे लांजा, पाली संगमेश्वर करत रात्री ८.४५ पर्यंत चिपळूण (शिवाजीनगर) बसस्थानकात पोहोचलो. तेथे Crew Change होऊन आम्ही १२.०० पर्यंत माणगाव येथे पोहचलो व माझा ७ दिवसांचा पास संपला. पुढील प्रवास तिकीट काढून फक्त २.३० तासात माणगाव ते पनवेल आलो व राजधानी प्लॅनची सांगता झाली. 



विशेष आभार :

१) प्लॅनमधील काही ठिकाणे वगळता संपूर्ण प्लॅनची आखणी ही आपल्या ग्रुपचे अॅडमीन स्वप्नील पाटील सर यांची होती. त्यांनी प्लॅनवर जाण्या अगोदर केलेल्या मार्गदर्शनामुळेच एवढा मोठा राजधानी दौरा पुर्ण करू शकलो. त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. 

२) त्याचप्रमाणे संपूर्ण राजधानी दौरा पुर्ण करण्यासाठी आपल्याच ग्रुपचे ठाण्याचे जितेंद्र मालुसरे सर , शहादाचे प्रकाश वसावे सर , सावंतवाडीचे प्रथमेश गुरव सर व अलिबागचे जयदीप पाटील सर यांची खूप मोलाची साथ लाभली त्याबद्दल त्यांचेदेखील मनापासून खूप खूप धन्यवाद. 



धन्यवाद


-- Akshay Palkar

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.