एसटीचे फोटो काढण्यामागे असणारी मेहनत

नमस्कार मंडळी.
आज एका महत्त्वाच्या विषयावर लिहीत आहे. याविषयावर लिहायचे बऱ्याच दिवसांपासून मनात होते कारण एसटी प्रेमी आणि त्यांचा छंद ह्याबद्दल अतिशय महत्वाची गोष्ट आहे.

अगदी खूप आधीपासून एसटी प्रेमी ग्रुप मध्ये एकमेकांचे फोटो व्हिडिओ चोरणे, इकडचे फोटो तिकडे पोस्ट करणे, स्वतःचे नाव टाकून दुसऱ्याचे फोटो वापरणे असे अनेक प्रकार अगदी सर्रास पणे सुरू आहेत. आम्ही admin मंडळी असं करू नका, असे बोंबलत असतो मात्र तरीही हे प्रकार काही थांबत नाहीत. 
आता तर ह्यात अनेक नवीन नवीन पळवाटा शोधून दुसऱ्याचे फोटो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरणे सुरू झालेले आहे.

तर ह्याच विषयावर मत व्यक्त करण्यासाठी आणि असे दुसऱ्याचे फोटो का वापरू नयेत ह्या मागची भूमिका सांगण्यासाठी हा लेखप्रपंच.

सर्वप्रथम आपण स्वतः एसटीचे काढून ते पोस्ट करण्यात किती मेहनत असते ते पाहूया

एसटीचे फोटो काढणे.
आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी एसटीचे फोटो काढले आहेत. त्यामुळे त्यामागे असणारी मेहनत आपल्याला चांगलीच माहिती आहे.
 बसस्थानकावर फोटो काढण्यासाठी तर विशेष मेहनत घ्यावी लागते. तेथील गाड्यांची व प्रवाशांची गर्दी, चालक वाहक ह्यांच्या नजरा चुकवून फोटो काढणे, तासनतास बस फॅनिंग करणे ह्यात खूप मेहनत असते.

तसेच हायवे वर एसटीचे फोटो काढण्यासाठी खूप संयम लागतो, काही जण तर कित्येक किलोमीटर घाटातून चालत जातात.
अशाप्रकारे एसटीचे फोटो काढण्यासाठी बराच वेळ, कष्ट आणि अन्य संसाधने खर्च होत असतात.  त्याचप्रमाणे काही एसटी प्रेमी थोडी थोडी नियमित बचत करून फोटो काढण्यासाठी चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेणे, नवीन कॅमेरा घेणे, एक्स्ट्रा बॅटरी घेणे ह्यासाठी बरेच प्रयत्न करीत असतात.

तसेच खास विविध भागातील एसटीचे फोटो काढण्यासाठी अनेक एसटी प्रेमी पैशांची बचत करून, सुट्टी, वेळ असे सर्व ताळमेळ बसवत एकदिवसीय, ४ दिवसांचे किंवा ७ दिवसांचे प्रवास दौरे करत असतात.   एसटीचा प्रत्येक फोटो हा वरील सर्व त्याग, कष्ट, जिद्द ह्याचे फळ असते. ह्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवणे खूप गरजेचे आहे.

एसटीचे फोटो जतन करून ठेवणे

फक्त एसटीचे फोटो काढणे हे कठीण तर आहेच मात्र त्याहून महत्वाचे आहे ते म्हणजे ते फोटो जतन करून ठेवणे. ह्यासाठी नवीन मेमरी कार्ड घेणे, नवीन हार्ड डिस्क घेणे, सर्व फोटो सेव्ह करून त्यांचा बॅक अप घेऊन ठेवणे असे अनेक प्रकारे मेहनत घेत असतात.  काही एखादा मेमरी कार्ड खराब होतो, काही फोटो डिलीट होतात, हार्ड डिस्क खराब होते, व्हायरस येतो त्यामुळे बरेच एसटीचे फोटो डिलीट होतात अशा वेळी एसटी प्रेमी जिवाच्या आकांताने ते फोटो वाचवण्यासाठी धडपडत असतात. असा डाटा पुन्हा मिळवण्यासाठी बराच खर्च येतो.

फोटो ग्रुपवर पोस्ट करणे.

असे फोटो ग्रुप वर पोस्ट करणे ह्यात सुद्धा मेहनत असते. योग्य वेळी योग्य फोटो पाहून निवडणे, आवश्यकता असल्यास एडिट करणे, सोबत नेमकी माहिती मिळवणे, ती पोस्ट टाईप करून मग सर्व एसटी प्रेमी मित्रांसमोर सादर करणे. हे सर्व जेव्हा यशस्वीपणे पूर्ण होते तेव्हा आपल्याला एसटीचा फोटो पहायला मिळतो.

तर मंडळी एसटीचा फोटो काढून तो ग्रुप वर पोस्ट करणे हे एवढे मोठे दिव्य असते. जे सदस्य स्वतः एसटीचे फोटो काढून पोस्ट करतात त्या सर्वांना ह्या वरील सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना असणारच. 
त्याचप्रमाणे स्वतः ही सर्व मेहनत करून समस्त एसटी प्रेमींपुढे सादर करणे आणि त्यांची वाहवा मिळवणे ह्यात प्रत्येक एसटी प्रेमीला वेगळाच अभिमान वाटत असतो.

आता जर एसटीचा फोटो आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी किती मेहनत असते ह्याची कल्पना आली असेल तर जरा विचार करा की जेव्हा आपण असा दुसऱ्याचा फोटो स्वतःच्या नावाखाली पोस्ट करतो तेव्हा त्या एसटी प्रेमीचा, त्याच्या मेहनतीचा किती अपमान करतो. म्हणूनच आपण ग्रुपवर वारंवार सांगत असतो की दुसऱ्यांनी काढलेले फोटो ग्रुपवर पोस्ट करू नका. फक्त स्वतः काढलेले फोटो पोस्ट करा. 

एसटीच्या फोटोंचा असा गैरवापर टाळण्यासाठी बरेच सदस्य फोटोवर स्वतःच्या नावाचा वॉटरमार्क टाकतात. आता तो वॉटरमार्क कसा असावा ह्याचे प्रत्येक एसटी प्रेमीला स्वातंत्र्य आहे. दुर्दैवाने असे वॉटरमार्क खोडून त्यावर स्वतःचा वॉटरमार्क टाकणारे काही महाभाग सुद्धा आहेत.

तसं पाहिलं तर इंटरनेटवर असे फोटो आणि व्हिडिओ चोरीचे प्रकार सर्वत्र सुरु आहेत. मात्र आपण आपल्या एसटी प्रेमींच्या समुदायामध्ये आपण प्रत्येक एसटीच्या फोटोमागे असणाऱ्या एसटी प्रेमींच्या मेहनतीची जाण राखत त्याचा उचित मान त्याला मिळवून देऊया. 

सध्या दुसऱ्यांचे फोटो पोस्ट करताना Respective Owner /PC. RO. चे प्रकार वाढत आहेत. अगदी तो फोटो कुणाचा आहे हे माहिती असून सुद्धा फक्त ते नाव लिहायचा कंटाळा म्हणून अगदी सर्रासपणे RO लिहणे सुरु असते. दुर्दैव ह्याच गोष्टीचे वाटते की एवढी मेहनत घेऊन जो सदस्य फोटो पोस्ट करतो त्याच्या मेहनतीची आपण PC RO ह्या ४ अक्षरात किंमत करतो.  तरी सर्व सदस्यांना  आवाहन करीत आहोत की आपण स्वतःहून ह्यावर नियंत्रण आणा. जर हे प्रकार कमी झाले नाहीत तर नाईलाजास्तव admin टीमला ह्याबद्दल कडक नियम करावे लागतील. 

एसटीच्या फोटोंबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे इंटरनेटवरील सुमारे ९०% हुन जास्त एसटीचे फोटो हे आपल्याच ग्रुपच्या सदस्यांनी काढलेले आहेत. त्यामुळे थोडी चौकशी केल्यास तो फोटो नेमका कुणी काढलाय हे समजते.    

सर्वांसाठी सूचना
शक्यतो स्वतः काढलेले फोटोच ग्रुपवर पोस्ट करा. फक्त अगदी अपवाद असेल तरच दुसरे फोटो पोस्ट करा. 
जर फोटो स्वतः काढलेला नसेल तर ज्याचा फोटो आहे त्याला योग्य ते श्रेय दिलेच पाहिजे.
नुसते forwarded फोटो व व्हिडिओ ग्रुपवर टाकू नका. ज्याने फोटो काढला आहे त्याला त्याच श्रेय द्या.
कोणत्याही परिस्थितीमध्ये एसटीबद्दलची चुकीची माहिती प्रसारित करू नका.  

धन्यवाद. 

-- स्वप्निल पाटील. 

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.