एसटी प्रेमी - जिवाभावाचे मैतर
एसटी प्रेमी - जिवाभावाचे मैतर
मैत्री - साऱ्या विश्वातील चिरकाल टिकणारे, सहज, सुंदर आणि प्रभावी नाते म्हणजे मैत्री होय. खरी मैत्री ही अगदी निखळ आणि अलौकिक आनंद देणारी असते. मित्रांकडून कायम सकारात्मक ऊर्जा मिळत असते. म्हणून जगातील प्रत्येकजण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सच्चा मैत्रीसाठी आसुसलेला असतो. खरा मित्र आहे सूर्यासारखा असतो. जो आपल्याला नेहमी स्वच्छ उजेडात मार्ग दाखवीत असतो. त्याच्या सान्निध्यात असताना कोणतेही वावगे कृत्य करण्याची आपल्याला भीती वाटते.
आपल्या वाटाड्याच्या ह्या एसटी प्रेमी विशेषांकामध्ये आपण एसटी प्रेमींची व्याख्या, ओळखपत्र, उपक्रम, इत्यादींचा आढावा घेऊन एसटी प्रेमींच्या रंजक विश्वाची सफर केली. ह्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे एसटी प्रेमींमधील जिवाभावाचे मैतर. अनेक एसटी प्रेमींमध्ये अगदी हेवा वाटावा अशी घनिष्ठ मैत्री आहे.
एसटी प्रेमामुळे एकत्र आल्याने त्यांच्यात अगदी जीवकंठश्च मैत्री झालेली आहे. अवघ्या काही महिन्यात अथवा वर्षातच ह्यापूर्वी कधीही न भेटलेल्या व्यक्ती एकमेकांचे जिवलग मित्र बनलेले आहेत. सर्व एसटी प्रेमी एकमेकांमध्ये मैत्री वाढावी म्हणून कायम प्रयत्नशील असतात. एसटी प्रेमींमध्ये कायम एसटी बद्दल शेअरिंग, फोटोंची देवाण घेवाण, एकत्र प्रवास, चर्चा, भेटीगाठी सुरूच असतात. ह्यामधूनच एसटी प्रेमींची मैत्री खुलत जाते. मित्रत्वाचे नटे अधिक गडद होत जाते. एसटीवरील प्रेम हा ह्या मैत्रीतील सामान धागा असतो. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राहणारे एसटी प्रेमी एकमेकांचे चांगले मित्र बनलेले आहेत.
एसटी प्रेमममधील अशी जिवाभावाची मैत्री अतिशय महत्वाची आहे. कारण आपल्या ग्रुपचे ब्रीद वाक्यच आहे "आम्ही आहोत एसटी प्रेमी". ह्यातून आपण आपले एकीचे बळ सिद्ध करीत आहोत. म्हणजेच एकट्यादुकट्या एसटी प्रेमीला विशेष महत्व नाही मात्र असे अनेक एसटी प्रेमी एकत्र आले तर मग त्यांच्याकडून मग खूप चांगल्याप्रकारे एसटी प्रेमाचा छंद जोपासला जातो.
एसटी प्रेमींची ग्रेट भेट कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी होणारी एसटी प्रेमींची भेट ही कायम ग्रेटच असते. म्हणूनच आपण ह्या भेटीला ग्रेट - भेट असं म्हणतो. अशा भेटीनंतर एक सेल्फी काढून ग्रुपवर पोस्ट करणे हे एक महत्वाचे काम असते. ह्या भेटीमध्ये एसटी जगतातील बरीच नवनवीन माहिती एकमेकांना दिली जाते. मोबाईल मधील फोटो बघितले जातात. समोर येणाऱ्या बसचे फोटो काढण्यासाठी लगबग सुरु होते. हे सर्व सुरु असताना एसटी प्रेमी इतके रंगून जातात की एसटी प्रेमींची एक तंद्रीच लागते. अगदी तहान भूक विसरून एसटी फॅनिंग सुरु असते. ज्याप्रमाणे एखादे प्रेमरंगात न्हाहून निघालेले जोडपे सार्वजनिक ठिकाणी आपल्या च विश्वात रममाण होऊन जाते अगदी त्याचप्रमाणे एसटी प्रेमी भेटल्यावर इतर सर्व गोष्टी बाजूला राहून एसटीच्या विश्वामध्ये रमून जातात.
जेव्हा काही एसटी प्रेमी प्रवास दौऱ्यावर असतात. तेव्हा आपल्या ग्रुप सदस्य अगदी वेळात वेळ काढून खास भेटण्यासाठी येतात त्यावेळी आपली जिवाभावाची माणसं भेटल्याचा दिलासा मिळतो आणि प्रवासाचा क्षिण पूर्णपणे काहीसा होतो.
एसटी प्रेमींच्या मैत्रीचे फलित म्हणजे त्यांच्यातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम. बसची सजावट, बोर्ड देणे, प्रवासी सहायता कक्ष असे अनके उपक्रम एसटी प्रेमी एकत्र येऊन राबवित असतात.
ज्याप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारचे मित्र असता म्हणजेच शाळेतील मित्र, कॉलेज मधील मित्र, गावाकडचे मित्र. ह्यातच आता एसटी प्रेमी मित्र हा एक नवीन मित्रांचा प्रकार एसटी प्रेमींच्या आयुष्यात आलेला आहे.
अशाप्रकारच्या ह्या मैत्रीमुळेच एसटी प्रेम हे फक्त छंदा पुरते मर्यादित राहिले नसून जीवाला जीव देणारे मित्र भेटण्याचे एक माध्यम झालेले आहे. हयामुळे आपले आयुष्य समृद्ध होऊन एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते.
आम्ही आहोत एसटी प्रेमी
जगावेगळा छंद आमचा जगावेगळी मैत्री
--- स्वप्निल पाटील - पनवेल ९८६९५६५९६१
Comments
Post a Comment