MSRTC LOVERS GROUP चे नियम

MSRTC LOVERS GROUP च्या प्रत्येक सदस्यासाठी आपल्या ग्रुपची मार्गदर्शक तत्वे - Guidelines to be followed by every member of MLG.
१. आपला हा ग्रुप फक्त एसटी प्रेमींचाच ग्रुप आहे. प्रत्येकाचे वय, शिक्षण, अनुभव इत्यादी गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाची मते, विचार वेगवेगळे असतात. अशा सर्व मतांचा आणि ग्रुपमधील सदस्यांचा आदर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशावेळी एकमेकांना संबोधित करताना "सर" असा आदरार्थी शब्द वापरणे ही आपल्या ग्रुपची परंपरा आहे.
२. आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विविध भागातील सदस्य आहोत. आपल्या जवळच्या आगारातील, विभागातील एसटी बसेस बद्दल ओढ वाटणे स्वाभाविक आहे. मात्र असे करीत असताना इतर विभागातील सदस्यांना परके वाटणार नाही ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील एसटीवर आपण सारखेच प्रेम करावे ही विनंती.
३. तुम्हाला जर एसटी विषयक कोणतीही माहिती हवी असेल, तर आपण विचारू शकता . मात्र आपण ग्रुप कडून किती माहिती घेतो आणि ग्रुपला किती माहिती देतो ह्याचे भान प्रत्येकाने ठेवावे. ग्रुपवर विचारलेल्या एखाद्या गोष्टीविषयी जर आपणाला खात्रीशीर माहिती असेल, तरच आपण उत्तरे द्या. कृपया कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नका.
४. ह्या ग्रुप मध्ये फक्त आणि फक्त एस. टी. विषयक पोस्ट टाका, अन्य कोणतेही जोक्स, कविता किंवा इतर गोष्टी पोस्ट करू नयेत.
५. आपल्या ह्या ग्रुप मध्ये एसटीच्या अपघाताचे फोटो पोस्ट करू नयेत. "अपघाताचे फोटो मला पर्सनल वर पाठवा" असे मेसेज सुद्धा ह्यापुढे ग्रुपवर चालणार नाहीत.
६. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून काही सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर होणारी मैत्री अथवा वादविवाद यासाठी ग्रुपचा कोणताही ऍडमिन किंवा सदस्य कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. कोणत्याही ग्रुप सदस्यासोबत वैयक्तिक संपर्क वाढविताना स्वतःच्या जबाबदारीवरच वाढवावा.
७. आपल्या ह्या ग्रुप मध्ये कोणतेही नेट वरून डाउनलोड केलेले, whatsapp वरून आलेले, इतर ग्रुपमधून आलेले फोटो पोस्ट करू नका. अपवादात्मक परिस्थितीत असा फोटो टाकायचा झालाच तर तो कुणी काढलाय आणि तुमच्याकडे कसा आला हे त्या फोटो खाली स्पष्टपणे नमूद करा.
८. फेसबुक ग्रुपवर प्रत्येक सदस्य दिवसातून फक्त २ फोटोच पोस्ट करू शकतो. यापेक्षा जास्त फोटो असतील तर फोटो अल्बम पोस्ट करावा. तसेच आठवड्याला फक्त एकच फोटो अल्बम पोस्ट करता येईल.
९. MLG च्या कोणत्याही सदस्याला एसटी बसचे तसेच बसस्थानक आवारात फोटो काढायची अधिकृत परवानगी नाहीये. प्रत्येक सदस्याने आपापल्या जबाबदारीवरच फोटो काढावेत. बस फॅनिंग करताना घडलेल्या कोणत्याही अनुचित प्रकारास ग्रुपचा कोणताही ऍडमिन किंवा सदस्य कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. आपल्या ग्रुपतर्फे तयार केलेल्या "एसटीचे फोटो काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना" सर्वांनी आवर्जून वाचाव्यात आणि त्यांचे पालन करावे.
१०. एसटीसंबंधी तक्रारी, सूचना, इत्यादी बाबी आपल्या ग्रुपवर मांडल्याने त्यावर फक्त चर्चा होऊ शकते त्यापलीकडे विशेष काही नाही. मात्र त्याच तक्रारी, सूचना एसटीच्या संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात पाठविल्यास जास्त परिणामकारक ठरतील. त्यासाठी आपल्या ग्रुपमधील काही सदस्य मदत करू शकतील.
११. सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी ह्या ग्रुपवर "एसटी प्रेमी" म्हणूनच राहावे ही विनंती.
१२. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, संघटना, अधिकारी- कर्मचारी ह्यांच्यावर निरर्थक टीका अशा प्रकारच्या गोष्टी ग्रुपवर चालणार नाहीत. कारण ह्या सर्व गोष्टी आपल्या ग्रुपच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जर काही सदस्यांना शक्य असल्यास त्यांनी स्थानिक पातळीवर काही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी ग्रुपमधील काही अनुभवी सदस्य मदत करू शकतील.
१३. जर आपल्याला एखादी विसंगत पोस्ट आढळली, तर कृपया त्या बाबतीत ADMINS ना कळवा. कोणत्याही परिस्थितीत आपण थेट त्या सदस्याला काहीही बोलू नका. ADMINS चुकीची पोस्ट टाकणाऱ्यावर योग्य कारवाई करतील.
१४. MSRTC LOVERS GROUP चे नाव, लोगो इत्यादी बाबी एसटी संबंधी अथवा कोणत्याही ठिकाणी वापरण्यापूर्वी ऍडमिन सोबत सल्लामसलत करावी.
१५. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण एसटी संबंधी कोणतेही उपक्रम स्वखुशीने आणि स्वखर्चाने करीत असाल उदा. बसला बोर्ड देणे इत्यादी. तर आपण ग्रुपकडे त्याची माहिती द्यावी जेणेकरून अशा सर्व उपक्रमांची आपल्याला एकत्रित माहिती संकलित करता येईल. आणि भविष्यात आपल्याच ग्रुपला त्याचा फायदा होईल.
१६. ग्रुप फोटो ADMIN व्यतिरिक्त इतर कोणीही चेंज करू नये.
१७. आपल्या कोणत्याही पोस्टमुळे, मतामुळे, फोटोमुळे ग्रुपच्या शांततापूर्ण वाटचालीस बाधा येणार नाही ही ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांची जबाबदारी आहे.
१८. हा ग्रुप म्हणजे एक भले मोठे कुटुंब आहे. आणि आपले एसटी प्रेमींचे कुटुंब सतत वाढतच आहे. तेव्हा आपण सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेतच आपल्याला एकत्रितपणे पुढे वाटचाल करायची आहे.
वरील सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन सर्व सदस्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करणाऱ्या सदस्यांना जास्तीत जास्त १ ते २ वेळा त्याबाबत विनंती केली जाईल मात्र त्यानंतर ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल आणि एकदा MSRTC LOVERS GROUP ग्रुपमधून बाहेर काढल्यावर त्यात पुन्हा सामील होणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. तेव्हा सर्व सदस्यांनी अगदी जबाबदारीपूर्वक MLG मध्ये राहावे ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.